मुंबई प्रतिनिधी । आजपासून नवरात्र उत्सवाला सुरूवात झाली असून घरोघरी घटस्थापना केली जातेय. नवरात्री हा तर मनमुराद नाचण्याचा, रंगांमध्ये सजण्याचा सण आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आजपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. प्राचीन काळापासून शक्तीच्या उपासनेला महत्त्व दिलं गेलंय. कोकणातही नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. कुडाळच्या केळबाई देवीच्या मंदिरात आज घट बसवण्यात आले. मातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कडधान्ये रुजत घालून त्यावर कलश ठेवून देवीची आराधना करण्याची प्रथा गावागावात आहे. शेतक-यांना संपन्नता लाभावी, आणि स्त्रीला अन्यायाविरोधात लढण्याची शक्ती मिळावी म्हणून नऊ रात्री देवीचा जागर केला जाणार आहे. यंदा मंदी आणि पावसाचा सणांवर परिणाम झाला आहे. मात्र रोजच्या धावपळीतून आनंदाचे चार क्षण नवरात्रीत नक्कीच मिळतात. गरबा खेळण्यातून मिळणारी सकारात्मक ऊर्जा साठवण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. आता पुढील नऊ रात्री अनेक मुंबईकर चनिया, घागरा, कुर्ते, इंडो-वेस्टर्न कपडे घालून मुंबईला आपल्या अनोख्या रंगांमध्ये रंगवणार आहेत. नवरात्रीनिमित्त खरेदीसाठी शनिवारी स्थानिक बाजारपेठांमध्ये गर्दी झाली होती. घागरा, रंगीत जॅकेट, चमकदार ब्लाऊज, कुर्ते यांच्या स्टॉलला गराडा होता. पावसाचा फटका फुलबाजाराला बसला असला तरी घरी घट बसवणाऱ्यांची फुलबाजारात गर्दी होतीच.