नाथाभाऊंवर राजकीय आकसापोटी कारवाई ! : नवाब मलीक

मुंबई प्रतिनिधी | एकनाथराव खडसे यांच्यावर राजकीय आकसासोटी कारवाई करण्यात येत असून या चौकशीतून ते सहीसलामत बाहेर पडतील असे प्रतिपादन आज राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलीक यांनी केले.

भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणात माजी मंत्री एकनाथराव खडसे हे पत्नी आणि जावयासह गोत्यात आले आहेत. या प्रकरणात त्यांचे जावई सुमारे सव्वा तीन महिन्यांपासून कारागृहात असून कालच त्यांच्या सौभाग्यवती मंदाताई खडसे यांना मुंबई सत्र न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे. तर खडसे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना दिलासा मिळालेला असला तरी त्यांच्या जामीनावर अद्याप सुनावणी प्रलंबीत आहे.

या पार्श्‍वभूमिवर आज कौशल्य विकास मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलीक यांनी एकनाथराव खडसे यांची जोरदार पाठराखण केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना जेरीस आणण्याचे काम भारतीय जनता पक्ष करत आहेत. यातच खडसे हे आधी भाजपमध्ये होते. तेव्हाच्या अंतर्गत कलहातून त्यांना त्रास देण्याचे काम सुरू असल्याचा आरोप नवाब मलीक यांनी केला. तर या संपूर्ण प्रकरणातून नाथाभाऊ हे सहीसलामत बाहेर येतील असा आशावाद देखील नवाब मलीक यांनी व्यक्त करत खडसे यांच्या पाठीशी पक्ष उभा असल्याचे स्पष्ट केले आहे.

Protected Content