जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील गिरणा नदीवर प्रस्तावित सात बंधाऱ्यांच्या प्रकल्पाला मंजुरी मिळूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने पाणीटंचाईचा प्रश्न अधिकच तीव्र बनला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कल्पिता रमेश पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली असून अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गिरणा धरणाखालील सुमारे १६८ किलोमीटर परिसरातील ६० ते ७० गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई आहे. या भागातील नागरिकांना गिरणा धरणातील आवर्तनावरच अवलंबून राहावे लागत असल्याने उन्हाळ्यात परिस्थिती अधिक बिकट होते. या समस्येच्या निराकरणासाठी गिरणा नदीवर साखळी बंधाऱ्यांची उभारणी करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी अनेक वर्षांपासून सातत्याने केली होती.

माननीय राज्यपालांच्या २९ सप्टेंबर २०१८ च्या पत्रानुसार या प्रकल्पास नवीन प्रकल्प म्हणून मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर २८ डिसेंबर २०१८ रोजी शासन निर्णयाद्वारे सुमारे ७११.१५ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. ही मान्यता केंद्र शासनाकडून शंभर टक्के अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अटीवर देण्यात आली होती.
प्राथमिक सर्वेक्षणानुसार मेहुनबारे, बहाळ (ता. चाळीसगाव), पांढरद, भडगाव (ता. भडगाव), परधाडे, कुरंगी (ता. पाचोरा) आणि कानळदा (ता. जळगाव) या ठिकाणी बंधारे उभारण्याचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पासाठी पर्जन्यमान व नदीतील पाण्याचा प्रवाह यांचा सखोल अभ्यास करण्यात आला असून सुमारे २४.४८१ दलघमी (०.९० टीएमसी) पाणी वापर गृहीत धरण्यात आला आहे. मुख्य अभियंता, नियोजन व जलविज्ञान प्रकल्प, नाशिक यांच्याकडून सातही बंधाऱ्यांसाठी स्वतंत्र पाणी उपलब्धता प्रमाणपत्र देण्यात आले असून केंद्रीय जल आयोगाची मान्यताही या प्रकल्पाला प्राप्त आहे.
सर्व आवश्यक मंजुरी व प्रमाणपत्रे उपलब्ध असतानाही प्रत्यक्ष काम सुरू झालेले नसल्यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या बंधाऱ्यांमुळे शेतीसाठी पाणी उपलब्ध होऊन सिंचनक्षमता वाढेल तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात सुटेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
कल्पिता पाटील यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर या प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी सुरू झाली नाही, तर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने मोठ्या प्रमाणावर शेतकरी आंदोलन उभारले जाईल तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला जाईल. या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि खासदार स्मिताताई वाघ यांनाही पाठविण्यात आली आहे.
या निवेदनावर वाय. एस. महाजन, अशोक लाडवंजारी, सुनिलभाऊ माळी, गौरव वाणी, सौ. प्रतिभा शिरसाठ, योगेश लाडवंजारी, हितेंद्र पाटील, अंकित शिंदे, लक्ष्मण पाटील, आशा पवार, प्रफुल पवार आणि संजय पाटील यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.



