जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त जळगावातील पक्ष कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली, तर पक्षासाठी आयुष्यभर योगदान देणाऱ्या जेष्ठ कार्यकर्त्यांचा विशेष सन्मान करून त्यांच्या कार्याची उजळणी करण्यात आली.
स्थापना दिनाच्या निमित्ताने पक्षाशी एकनिष्ठ राहून दीर्घकाळ कार्य करणाऱ्या तब्बल ४६ जेष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपाचे जुने चिन्ह असलेले जनसंघाचे “दीपक” आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार राजू मामा भोळे, खासदार स्मिताताई वाघ, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर दीपमाला काळे, विशाल त्रिपाठी, उदय भालेराव यांच्यासह अनेक नगरसेवक व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कार्यक्रमात बोलताना खासदार स्मिताताई वाघ यांनी जेष्ठ कार्यकर्त्यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. मंदिराचा कळस जितका महत्त्वाचा असतो, तितकीच त्याची पायरीही महत्त्वाची असते, या उदाहरणातून त्यांनी कार्यकर्त्यांच्या भूमिकेचे महत्त्व स्पष्ट केले. जेष्ठ कार्यकर्त्यांनी दिलेल्या बलिदानामुळेच आज भारतीय जनता पक्ष भक्कमपणे उभा आहे. नवीन पिढीला पक्षाचा इतिहास आणि त्यामागील संघर्ष समजावा, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार राजू मामा भोळे यांनीही आपल्या मनोगतात पक्षाच्या विचारसरणीवर प्रकाश टाकला. ‘सर्वप्रथम राष्ट्र, त्यानंतर समाज, पक्ष आणि शेवटी मी’ या विचारधारेने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळेच पक्षाची वाटचाल यशस्वी होत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून उद्योग बचत गटांमधील महिलांसाठी सुमारे पाच कोटी रुपयांच्या निधीचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमादरम्यान जेष्ठ कार्यकर्त्यांच्या अनुभवांना उजाळा देत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. उपस्थित कार्यकर्त्यांनीही या सन्मान सोहळ्याचे स्वागत करत पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी एकजूट दाखविली.
याप्रसंगी खासदार स्मिता वाघ यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाप्रसंगी महापौर दिपमाला काळे, स्थायी समिती सभापती डॉ.चंद्रशेखर पाटील, मनपा सभागृह नेते नितीन लढ्ढा ,गटनेते प्रकाश बालानी, उदय भालेराव, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र सोनवणे, विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, नितीन इंगळे, जयेश भावसार, महिला अध्यक्ष, नितू परदेशी ,युवा मोर्चा अध्यक्ष महेश पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज भांडारकर यांनी केले कार्यक्रमाचे संयोजक प्रदीप रोपे व सह सयोजक सागर पाटील होते.



