जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील करंजी व दळवेल या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी संपादित करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यावेळी मिळालेला मोबदला कमी असल्याने शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे वाढीव मोबदला मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. जिल्हाधिकारी साहेबांनी शेतकऱ्यांना न्याय देत, वाढीव रक्कम आणि सर्वोच्च न्यायालयाच्या ‘तरसेमसिंग वि. युनियन बँक ऑफ इंडिया’ या निकालाच्या अंतिम आदेशानुसार दिलासा रक्कम व वाढीव व्याज देण्याचा आदेश पारित केला होता.
या आदेशानुसार, शेतकऱ्यांनी ४ फेब्रुवारी २०२५ रोजी न्यायालयात दरखास्त (अर्ज) दाखल केली. त्यावेळी सिनियर डिव्हिजन जज एस. एस. परदेशी साहेबांनी जप्ती वॉरंटचा आदेश दिला. त्यानुसार, आज (१९ जून २०२५ रोजी) राष्ट्रीय महामार्गाच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात आली. यामध्ये युवराज पाटील यांच्यासाठी ९४ लाख १६ हजार ९६६ रुपये, संजय पाटील यांच्यासाठी ३० लाख १६ हजार ९८१ रुपये, जगन्नाथ पाटील यांच्यासाठी १८ लाख ९६ हजार ,७९४ रुपये आणि संजय राजधर पाटील यांच्यासाठी ५ लाख ४५ हजार ६६४ रुपयांसाठी मालमत्ता जप्त करण्यात आली.
या जप्ती कार्यवाहीवेळी पंच म्हणून सुनील गिरासे आणि संभाजी पाटील उपस्थित होते. न्यायालयाचे बेलीफ चंदनकर, भाऊसाहेब रोटे, भाऊसाहेब नाजर आणि श्याम शिंदे यांनी ही कार्यवाही पूर्ण केली. शेतकऱ्यांच्या वतीने ॲड. तुषार पाटील, ॲड. कुणाल पवार, ॲड. ओम त्रिवेदी, ॲड. कल्पेश पाटील, ॲड. सुनील माळी आणि ॲड. धीरज जैन हे वकील म्हणून हजर होते. शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन संघर्षाला मिळालेले हे यश महत्त्वाचे मानले जात आहे.