महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्र्यांकडून राष्ट्रध्वज वंदन; सर्वांना दिल्या शुभेच्छा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पोलीस कवायत मैदान येथे राष्ट्रध्वज वदंन करून सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांना प्रथम अभिवादन करून पालकमंत्री म्हणाले, राज्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा मोठा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे. प्राचीन संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे महत्वपूर्ण योगदान आहे.

महाराष्ट्राचा सामाजिक सुधारणांचा इतिहास प्रेरणादायी असून महाराष्ट्र ही संत-महंत, ऋषि-मुनींची जशी भूमी आहे तशीच ती शूरवीरांचीही भूमी आहे. या भूमीला पराक्रमाची, त्यागाची, देशप्रेमाची परंपरा लाभली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले, सामाजिक समतेचा पाया रचणारे छत्रपती शाहू महाराज,भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सर्व थोर राष्ट्र नेत्यांच्या विचारांचा वारसा जपणारे आपले महाराष्ट्र राज्य असल्याची भावनाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. राज्याच्या विकासामध्ये आपल्या पूर्वजांनी दिलेले योगदान आणि वैभवशाली इतिहास जपत प्रगतीची नवनविन शिखरे पादाक्रांत करण्याचा निर्धार कामगार दिनाच्या निमित्ताने करण्याचे आवाहनही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

Protected Content