नशिराबादला महिनाभरात दीड कोटींचा निधी देणार-पालकमंत्री

नशिराबाद / जळगाव प्रतिनिधी- नशिराबाद हे तालुक्यातील मोठे गाव असून नगरपरिषदेच्या माध्यमातून याच्या विकासाला गती येणार असून येथील समग्र विकासासाठी आपण कटीबध्द आहोत.  शहराच्या विकासासाठी वर्षभरात तब्बल १५ कोटींचा निधी देण्यात येणार असून यात महिनाभरात दीड कोटी रूपयांचा निधी देण्यात येणार असल्याची महत्वाची घोषणा ना. गुलाबराव पाटील यांनी  केली. 

 नशिराबाद येथे नगरपरिषदेची घोषणा झाल्यानंतर आज पालकमंत्र्यांचा सर्वपक्षीय सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ना. पाटील बोलत होते. शहराच्या विकासासाठी वर्षभरात तब्बल १५ कोटींचा निधी देण्यात येणार असून यात महिनाभरात दीड कोटी रूपयांचा निधी देण्यात येणार असल्याची महत्वाची घोषणा त्यांनी केली. तर नगरपरिषद झाल्याने आधीच्या ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचा मोठा लाभ होणार असल्याचेही पालकमंत्री म्हणाले.

याबाबत वृत्त असे की, नशिराबाद येथील ग्रामपंचायतीच्या जागी नगपरिषद स्थापन करण्यात येईल असे अभिवचन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिले होते. त्यांनी याबाबतचा पाठपुरावा केल्याने दोन दिवसांपूर्वीच नशिराबाद येथील नगरपरिषदेची अधिसूचना निघाली आहे. पालकमंत्र्यांनी आपला शब्द पाळला म्हणून आज नशिराबाद येथे त्यांच्या सर्वपक्षीय सत्काराचे आयोजन करण्यात आले.

राजकीय अभिनिवेश दुर करा

याप्रसंगी सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा हृद्य सत्कार केला. याला उत्तर देतांना ना. गुलाबराव पाटील यांनी गावाच्या विकासात राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून एकत्रपणे काम करण्याचे आवाहन केले. शहराच्या विकासासाठी आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही देखील ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. ते  म्हणाले की, मी आधीच जाहीर केल्यानुसार ३० जून रोजी नशिराबाद येथील नगरपंचायतीची अधिसूचना निघावी यासाठी दिवसभर मी ग्रामविकास, नगरविकास खात्यांकडे स्वत: फिरून पाठपुरावा केला. यामुळे सायंकाळी साडेसहा वाजता नगरपरिषदेची अधिसूचना निघाली.

हवा भरणार्‍यांपासून सावधान !

ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, नशिराबाद येथे सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांमध्ये सलोखा असल्याची बाब ही अतिशय कौतुकास्पद आहे. यामुळे ग्रामपंचायतीसाठी दाखल करण्यात आलेले चारशे अर्ज मागे घेण्याची बाब शक्य झाली. आता देखील नगरपरिषदेची निवडणूक बिनविरोध करता आल्यास पहावे असे आवाहन ना. पाटील यांनी केले. ते शक्य न झाल्यास काही जागा तरी बिनविरोध कशा करता येईल याकडे लक्ष देण्याचे त्यांनी सूचित केले. तर प्रत्येक गावात निवडणुकीसाठी हवा भरणारे असतात. अशा हवा भरणार्‍यांपासून सावध राहण्याचे पालकमंत्री म्हणताच सभागृहात हशा पिकला.

धरणगावप्रमाणेच नशिराबादचाही होणार विकास

नगरपरिषद झाल्यामुळे आता नशिराबादच्या विविध विकासकामांना गती येणार आहे. आधीच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होणाऱ्या  प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र इमारत बांधकामासाठी ६ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असून वर्क ऑर्डर देखील झालेली असून लवकरच भूमिपूजन करणार असल्याचे सांगितले. तर, यापुढे शहरातील मुख्य भाग आणि कॉलन्यांमध्ये पायाभूत सुविधा प्रदान करण्यात येतील. धरणगाव येथे विकासकामांसाठी तब्बल २७ कोटी रूपये मंजूर करण्यात आले असून याच्याच धर्तीवर नशिराबादचा विकास करण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

 

कर्मचार्‍यांनाही होणार लाभ

नशिराबाद येथे आता नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात येणार असून यात तब्बल दरडोई १३५ लीटर प्रति दिन इतके पाणी मिळणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या  माध्यमातून शहरासाठी निधी मिळवून देणार असून लवकरच नगरपरिषदेला स्वत:ची इमारत मिळणार असल्याची घोषणा देखील ना. पाटील यांनी केली. तर, मुख्याधिकार्यांची नियुक्ती झाल्यानंतर तातडीने शहरात कामे सुरू होणार असल्याचे ते म्हणाले. आता ग्रामपंचायतीची नगरपरिषद होणार असल्याने येथील कायमस्वरूपी कर्मचार्‍यांना लाभ होणार असल्याची माहिती देखील त्यांनी केली. यामुळे त्यांचे वेतन वाढणार असून यासोबत ग.स. सोसायटीच्या माध्यमातून त्यांना अडी-अडचणीच्या काळात आर्थिक मदत मिळू शकते. येत्या एक – दोन वर्षात नशिराबाद हे पूर्णपणे बदलले असेल अशी ग्वाही पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी दिली.

 

यांची होती उपस्थिती

याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णुभाऊ भंगाळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य विश्‍वनाथ पाटील, शिवसेना महानगर प्रमुख शरद आबा तायडे, सरपंच विकास पाटील, उपसरपंच कीर्ती चौबे, माजी सरपंच पंकज महाजन, शिवसेना शहर प्रमुख विकास धनगर, शिवसेना युवा प्रमुख चेतन बर्‍हाटे, राष्ट्रवादी शहर चिटणीस प्रा. विश्‍वनाथ महाजन, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक कार्याध्यक्ष बरकत अली, मनसे तालुकाध्यक्ष मुकुंद रोटे, ग्रामपंचायत कर्मचारी वृंद, नागरिक आदी उपस्थित होते

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनसेचे मुकुंदा रोटे यांनी केले . सूत्रसंचालन प्रा विश्‍वनाथ महाजन यांनी तर आभार युवासेनेचे चेतन बर्‍हाटे यांनी मानले.

Protected Content