राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण रद्द; आमदार विनाय मेटे यांचा आरोप (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी महाराष्ट्रात संघर्ष करण्यात आला. या संघर्षाला फडणवीस सरकार असतांना यश आले. मात्र, राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण रद्द झाल्याचा आरोप, शिवसंग्राम संघटनेचे  राष्ट्रीय अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

आमदार विनायक मेटे पुढे म्हणाले की, मराठा समाजासाठी काही पाऊल उचलावे, सोयी-सुविधा देवून मराठा समाजाला दिलासा द्यावा. अशी अपेक्षा होती. दुदैर्वाने सरकार अपयशी ठरले असे म्हणत, आमदार मेटे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. 

राज्य मागासवर्गीय आयोगाकडे हा विषय सोपवून सर्व्हेक्षण करणे आणि मागासलेपण सिध्द करणे अपेक्षित होते. मात्र, या सरकारने काहीच केले नाही. अक्षरशः मराठा समाजाचे वाटोळे केल्याचा घणाघात आमदार मेटे यांनी केला. राज्य सरकारने २ सप्टेंबरपर्यंत मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय न घेतल्यास २ सप्टेंबरपासून राज्यात टप्प्याटप्प्याने आंदोलन करणार असल्याचा इशारा आमदार मेटे यांनी दिला. गणेशोत्सवानंतर मुंबईत उपोषण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्य सरकार निगरगठ्ठ असून, मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा एल्गार करण्याची घोषणा आमदार मेटे यांनी यावेळी केली. पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष ऍड. दिलीप पोकळे, ऍड. राजेश गवई आदी उपस्थित होते.

Protected Content