Home Cities एरंडोल पूरग्रस्तांना नारीशक्ती संस्था व रोटरी क्लबचा मदतीचा हात

पूरग्रस्तांना नारीशक्ती संस्था व रोटरी क्लबचा मदतीचा हात

0
261

एरंडोल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । एरंडोल शहरातील अंजनी नदीला आलेल्या महापुरामुळे म्हसावद नाक्याजवळील कुंभार वाडा आणि फकीरवाडा परिसरात अनेक कुटुंबियांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. घरात अचानक पाणी शिरल्यामुळे या कुटुंबांचे संसार उध्वस्त झाले, तर अनेकांचे व्यवसायही कोलमडले. या कठीण प्रसंगी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत जळगाव येथील नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था आणि रोटरी क्लब एरंडोल यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेत अत्यंत संवेदनशील आणि प्रभावी मदतकार्य उभारले.

दिनांक ४ ऑक्टोबर २०२५ रोजी या दोन्ही संस्थांनी पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंची किट तयार केली. या किटमध्ये धान्य, डाळी, तेलासोबतच ब्लँकेट्स यांचा समावेश होता. ही मदत थेट घरपोच नेऊन पूरग्रस्त नागरिकांना वितरित करण्यात आली. केवळ भौतिक मदतीपुरतेच कार्य न करता, या संस्थांनी पूरग्रस्तांच्या मनोबल उंचावण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधत मानसिक आधार देण्याचे कामही केले.

शासकीय यंत्रणेची मदत पोहोचण्यापूर्वीच या संस्थांनी वेळेची जाण ठेवत तातडीने मदत केली, यामुळे स्थानिक नागरिकांनी त्यांचे मन:पूर्वक आभार मानले. “संकटाच्या वेळी आपुलकीने मदतीचा हात पुढे करणाऱ्या या संस्थांचे योगदान अविस्मरणीय आहे,” अशी भावना पूरग्रस्तांनी व्यक्त केली.

या मदतकार्यामध्ये नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ. मनीषा पाटील यांच्यासह वंदना मंडावरे, नूतन तासखेडकर, किमया पाटील, हर्षा गुजराती, विभावरी पाटील तसेच रोटरी क्लब एरंडोलचे चार्टर अध्यक्ष व माजी नगरसेवक डॉ. नरेंद्र ठाकूर हे सहभागी झाले होते. त्यांच्या सोबत राजेंद्र चौधरी, देवा चौधरी, विक्की चौधरी, पवन चौधरी, मुश्ताक खाटीक, ज्योती राणे, नीता वानखेडकर, अ‍ॅड. सीमा जाधव, नेहा जगताप, आशा मौर्य, माधुरी टोके, माधुरी शिंपी यांचेही विशेष सहकार्य लाभले. नारीशक्ती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसोबत कुंभारवाडा मित्रमंडळानेही या उपक्रमात सक्रीय सहभाग नोंदवला.

याच पार्श्वभूमीवर जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (आय.ए.एस.) यांनी एरंडोलच्या पूरग्रस्त भागाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता. या दौऱ्यात त्यांनी एका निराधार वृद्ध आजीच्या निवृत्तीवेतन योजनेशी संबंधित समस्येवर तत्काळ कार्यवाही केली होती. याच आजीची नारीशक्ती संस्थेच्या सदस्यांनी स्वतः भेट घेऊन तिची चौकशी केली आणि तिला देखील मदतीचा हात दिला. भविष्यातही आवश्यक त्या सर्व मदतीसाठी संस्थेच्या वतीने सहकार्य दिले जाईल, असे आश्वासन देण्यात आले.

या सामाजिक संस्थांनी केवळ जीवनावश्यक वस्तूंचे वितरण न करता, आपुलकी आणि संवेदनशीलतेच्या भावनेतून पूरग्रस्तांच्या जिव्हाळ्याच्या गरजा ओळखून त्या पूर्ण करण्याचा केलेला प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी आहे.


Protected Content

Play sound