मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जात पडताळणी प्रकरणी अपात्रतेला स्थगिती मिळाल्यानंतर येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची सूत्रे आज पुन्हा नजमा तडवी यांनी स्वीकारली. याप्रसंगी ना. गिरीश महाजन व आ. मंगेश चव्हाण यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या २०१८ साली झालेल्या निवडणुकीत सुरेखा अफजल तडवी उर्फ नजमा इरफान तडवी यांनी भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर लोकनियुक्त नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवून विजय संपादन केला होता. नगराध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने नियमानुसार त्यांनी सहा महिन्यांच्या आत आणि सुधारित निर्देशानुसार एक वर्षाच्या आत आपले जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होते. मात्र पाच वर्षे उलटण्याच्या मार्गावर असतांना देखील त्यांनी अद्यापही जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नव्हते.
दरम्यान, गिरीश रमेश चौधरी यांनी जळगावच्या जिल्हाधिकार्यांकडे नजमा तडवी यांना अपात्र करण्यात यावे अशा मागणीचे अपील सादर केले होते. यावर सुनावणी झाल्यानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नजमा तडवी यांना ८ नोव्हेंबर २०२१ रोजी अपात्र ठरविले होते.
दरम्यान, नजमा तडवी यांनी आमदार चंद्रकांत पाटील आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून ना. गिरीश महाजन व पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना भेटल्या. यातून अलीकडाच त्यांच्या अपात्रतेला स्थगिती देण्यात आली असून ७ ऑगस्ट रोजी या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे सुनावणी होणार आहे. तर दुसरीकडे १७ ऑगस्ट रोजी नगरपंचायतीच्या पंचवार्षिकचा कालावधी पूर्ण होत असून नंतर प्रशासकराज येणार आहे. याआधी तडवी यांना अल्प काळ मिळणार असला तरी राजकीयदृष्ट्या तो अतिशय महत्वाचा मानला जात आहे.
या अनुषंगाने, नजमा तडवी यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची सूत्रे पुन्हा हाती घेतली. याप्रसंगी ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे, श्रीकांत महाजन आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.