अण्णांचा पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून उपोषणाचा इशारा

नगर- देशात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असून त्यावर केंद्र सरकारने कोणताही तोडगा न काढल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

अण्णा हजारे यांनी अण्णांनी म्हटलं- सरकार जर मागण्या पूर्ण करू शकत नाही तर त्यांनी खोटी आश्वासने देऊ नयेत, असं आमचं म्हणणं आहे. देशातील सरकारने सत्तेसाठी सत्य त्यागने बरे नाही. त्यामुळे देशातील जनतेपर्यंत चुकीचा संदेश जातो. जी गोष्ट करता येत नाही, ती करता येत नसल्याचं सरकारने स्पष्ट सांगायला हवं. त्यामुळे किमान मागणी करणारे लोक तो विषय सोडून तरी देतील. परंतु, जेव्हा सरकार अडचणीत येते तेव्हा त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना खोटी आश्वासने द्यावी लागतात, असं सांगतानाच मी माझ्या आयुष्यात कधीच खोटं बोललो नाही. त्यामुळेच सरकारचं हे वेळकाढू धोरण मला त्रासदायक वाटतं, असं अण्णांनी म्हटलं आहे.

केंद्र सरकारच्या संवेदनशीलतेवरही अण्णांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. सरकार शेतकऱ्यांबद्दल संवेदनशील आहेत तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होत आहेत? असा सवाल त्यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत अनेक कारणं आहेत. राज्य कृषी आयोग वेगवेगळ्या पिकांचा उत्पादन खर्चाची आकडेवारी केंद्र सरकारच्या कृषी विभागाला पाठवत असतो. पिकांचा उत्पादन खर्च ठरवण्यासाठी कृषी आयोगावर कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ असतात. त्यांनी दिलेल्या अहवालात कपात करता कामा नये. मात्र, तुमचे सरकार त्यात 50 ते 55 टक्के कपात करते. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात आणि शेतकऱ्यांच्या पिकांना उत्पादन खर्च योग्य मिळावा यासाठी निवडणूक आयोगाच्या धर्तीवर कृषी मूल्य आयोगाला स्वायत्ता दिली पाहिजे. या आयोगाला संवैधानिक दर्जा दिला पाहिजे, अशी मी मागणी केली होती. त्यावर उच्च स्तरीय तज्ज्ञांची समिती स्थापन करून निर्णय घेण्याचं आश्वासन तुम्ही दिलं होतं. परंतु, हे आश्वासनही पूर्ण करण्यात आलेलं नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं आहे.

Protected Content