विजेच्या धक्क्याने नगरपंचायत सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू; नातेवाईकांचा आक्रोश

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद नगरपंचायतीत काम करणाऱ्या साफसाफई कर्मचारी तरूण हा गटारीचे काम करतांना विजेच्या वायरचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी ५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विशाल गोपी चिरावंडे (वय-२६) रा. नशिराबाद ता.जि.जळगाव असे मयत नगरपंचायत सफाई कर्मचाऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद  विशाल गोपी चिरावंडे हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गेल्या दोन वर्षांपासून नशिराबाद नगरपंचायत येथे सफाई कर्मचारी म्हणून कामाला होता. नेहमीप्रमाणे विशाल चिरावंडे हा मंगळवारी ५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता नशिराबाद गावजवळील शेताजवळ गटारीचे काम करत असतांना त्याला विजेचा जोरदार धक्का लागला. हा प्रकार आजूबाजूच्या नागरीकांच्या लक्षात आल्याने त्याला उचलून खासगी वाहनातून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती त्याला मयत घोषीत केले. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. याबाबत नशिराबाद पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत तरूणाच्या पश्चात आई सुनिता, तीन भाऊ , पत्नी नैना, तर सोनी व काजल या दोन मुली असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

Protected Content