जळगाव, प्रतिनिधी | शहरातील साफसफाई ठेक्याचा विषय आज पुन्हा स्थायी समितीत गाजला. कचऱ्याच्या वजनात झालेल्या वाढीचा खुलासा सदस्यांनी अधिकाऱ्यांना विचारला. सदस्य यासंदर्भात तक्रार करून देखील कोणतीच कारवाई का करण्यात येत नाही याचा जाब सदस्यांनी आरोग्य विभागाकडे मागितला. सभापती शुचिता हाडा यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपायुक्त उत्कर्ष गुटे, उपायुक्त मिनीनाथ दंडवते, लेखा परिक्षक संतोष वाहुळे, लेखा अधिकारी कपील पवार उपस्थित होते.
शहरातील दैनंदिन साफसफाईच्या कामासंदर्भात सदस्यांनी आज पुन्हा प्रश्न उपस्थित केले. दोन दिवस झाले शहरात साफसफाई होत नसून यास जबाबदार कोण ? असा प्रश्न नितीन बरडे यांनी उपस्थित केला. दंड कपात करुन १ कोटी १९ लाख रुपये खर्च करुन शहरात साफसफाई होत नाही, पालिकेने काय चालविले आहे, असा प्रश्न विष्णु भंगाळे यांनी उपस्थित केला. मनपा प्रशासनान सफाई मक्तेदाराला नोटीस बजाविते आणि त्या नोटीसचा खुलासाही प्रशासनाच करीत असल्याचा आरोप भंगाळे यांनी केला. कर्मचाऱ्यांना पगार देणे ही वॉटरग्रेस कंपनीची जबाबदारी असतांना कर्मचाऱ्यांकडून मनपावर मोर्चा आणून मनपा प्रशासनावर बिल अदा करण्यासंदर्भात दबाव आणला जात असल्याचे दिसून येत असे भंगाळे व नितीन बरडे यांनी सभागृहाच्या निदर्शास आणून दिले. उपायुक्त मिनिनाथ दंडवते यांनी याबाबत खुलासा केला की, कंपनी कर्मचाऱ्यांशी चर्चाकरुन ही गोष्ट कर्मचाऱ्यांना समजविण्यात आले असल्याचे स्पष्ट केले. वजन वाढल्याच्या तक्रारी केल्यानंतरही मक्तेदाराला दंड आकारला किंवा नाही, हे देखील सदस्यांना सांगितले जात नाही, जर, नगरसेवक नाराज, नागरिक नाराज आहे. तरी मक्तेदाराला प्रशासन पाठीशी का घालते असा प्रश्न नितीन लढ्ढा यांनी उपस्थित केला. त्यावर सभापती शुचिता हाडा यांनी , मक्तेदाराला एका महिन्याची मुदत दिली आहे. त्यानंतर महासभेत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले. महापालिकेत गेल्या १६ महिन्यात कामांचे नियोजन होऊ न शकल्याने शासनाने मंजुर झालेला निधीला स्थगिती दिली आहे. १६ -१६ महिने निधीचे नियोजन होत नसेल तर, त्या पालिकेला निधीची आवश्यकता नसल्याचा निष्कर्ष शासन काढू शकते असे लढ्ढा यांनी निदर्शनास आणून दिले. २५ कोटी रुपयांच्या कामांचे श्रेय तत्कालीन सत्ताधाऱ्यांना जाऊ नये म्हणून विलंब केला असा आरोप केला. दि.३० नोव्हेंबरला दि.२५ कोटी रुपयांची मुदत संपुष्ठात आली असून अनेक कामे बाकी आहेत. ही कामे करण्यासाठी आत्ता मक्तेदारांमध्ये सभ्रम निर्माण झाला असून आपली बिले निघतील की नाही, अशी शंका उपस्थित होऊ लागली असल्याचेही लढ्ढा यांनी सांगितले. शहरातील प्रभाग एक व प्रभाग दोनमध्ये पहिल्या टप्प्यात भूमिगत गटारींचे काम सुरु झाले आहे. गटारींचे कामापुर्वी अमृतच्या पाईपलाईनचे काम पुर्ण होणे गरजेचे असतांना अद्याप निम्मे काम देखील झाले नाही, अमृतच्या कामाची मुदत संपुष्ठात आली तरीही काम होत नसल्याची खंत नवनाथ दारकुंडे यांनी व्यक्त केली.