
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गोलाणी मार्केट येथील व्यापारी संकुलात महापालिकेच्या वतीने रविवारी १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता मोठी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सुमारे ८ ते १० टन कचरा संकलित करण्यात आला असून, अस्वच्छता व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन आस्थापनांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
महापालिकेच्या स्वच्छता विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहराच्या मध्यवर्ती भागातील या व्यापारी संकुलाच्या स्वच्छतेसाठी विशेष मोहीम आखण्यात आली होती. या मोहिमेत २५ ते ३० कर्मचाऱ्यांची टीम तैनात करण्यात आली होती. कचरा उचलण्यासाठी एकूण १३ वाहनांचा वापर करण्यात आला. या प्रयत्नांतून ८ ते १० टन कचरा संकलित करण्यात आला, ज्यामुळे परिसरातील अस्वच्छतेची गंभीर समस्या उघड झाली. यावेळी, स्वच्छता निरीक्षकांनी संकुलातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन आस्थापनांवर कठोर कारवाई केली. त्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये दंड आकारण्यात आला, अशी माहिती स्वच्छता निरीक्षक रमेश कांबळे यांनी दिली. व्यापारी संकुलांनी परिसर स्वच्छ ठेवावा यासाठी महापालिका आता कठोर भूमिका घेत आहे. दंडात्मक कारवाईमुळे व्यापाऱ्यांनी सार्वजनिक स्वच्छतेचे नियम पाळावेत, असे आवाहन महापालिकेने केले आहे



