बीड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मराठे जातीयवादी असते तर दिवंगत गोपीनाथ मुंडे खासदार झाले नसते, त्यांच्या दोन्ही मुली खासदार, आमदार झाल्या नसत्या, पुतण्यासुद्धा आमदार झाला नसता असे विधान मराठा नेते मनोज जरांगे यांनी केले आहे. माजलगाव येथे एका कार्यक्रमात मनोज जरांगे पाटील बोलत होते. बीड लोकसभेमध्ये जातीचा मुद्दा पुढे आला असून त्या ठिकाणी मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्याकडून बीडमध्ये आधी असा वाद झाला नसल्याचं सागितले जाते आहे. त्यावर मनोज जरांगे यांनी आता वक्तव्य केले.
मराठे जातीयवादी असल्याचा आरोप केला जात आहे. पण आम्ही जातीयवादी असतो आम्हाला तुम्ही विरोधक समजत असाल तर मराठे कसे निवडून देतील तुम्हाला? तुम्ही आहात तरी किती? आम्ही एकटे मराठेच साडेसहा लाख आहोत, त्यात मुस्लीम तीन लाख मिसळले तर खाली काय राहते? असा सवालही त्यांनी यावेळी केला. बीड लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपच्या पंकजा मुंडे यांचा सामना महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांच्यासोबत होत आहे. बीड लोकसभेसाठी १३ मे रोजी चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे.