मुंबई (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यासारख्या शहराने फक्त ४९.८४ टक्के मतदान केल्यानंतर अवघ्या महाराष्ट्राच्या नजरा मुंबईतील मतदानाकडे लागल्या असतानाच सोमवारी मुंबईकरांचा मतोत्साह बराच वाढल्याचे दिसून आले. गेल्या तीन दिवसांपासूनची उष्णतेची लाट, उकाडा व त्यामुळे वाहणाऱ्या घामाच्या धारा, असे सर्व असतानाही मुंबईत सन २०१४च्या तुलनेत मतांचा पारा बराच वाढला. यावेळी सहा मतदारसंघातील सरासरी मतदान ५४.३० टक्के नोंदवले गेले. गेल्यावेळी, सन २०१४ मधील लोकसभा निवडणुकीवेळी ते ५१.५९ टक्के इतके होते. मुंबईत गेल्या ३० वर्षांतील हे सर्वाधिक मतदान आहे. राज्यातील एकूण४८ मतदारसंघातील मतदानाची आकडेवारी ६०.६८ टक्के असून, सन २०१४ मध्ये ती ६०.३२ टक्के होती.
लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई शहरातील दोन व मुंबई उपनगरातील चार मतदारसंघांत मतदानासाठी मतदारांनी सकाळी ७.०० पासूनच गर्दी केली होती. सकाळी ७ ते ९ दरम्यान या केंद्रांवर साधारणत: पाऊण ते एक तासाची रांग होती. सकाळी नऊनंतर ऊन तापू लागले, तशी गर्दी काहीशी कमी होईल अशी चिन्हे होती. पण, त्यानंतरही गर्दी वाढतच गेली. अनेक भागांत ११.०० च्या सुमारास एक ते दीड तासांची रांग होती. पुढे एकनंतर मात्र ऊन चांगलेच तापू लागल्याने अनेक भागांत गर्दी कमी झाली. पण, कांदिवली, वांद्रे पूर्व, विक्रोळीतील कन्नमवार नगर, वरळीतील जांबोरी मैदान, लालबाग-परळ, पार्ल्यातील टिळक विद्यालय, विलेपार्लेतील इर्ला, तळे पाखाडी (बोरिवली), बोरिवलीतील एक्सर, घाटकोपर पश्चिम आदी भागांत दुपारीसुद्धा तासाभराची रांग होती. संध्याकाळी पाचनंतर उन्हे ओसरू लागली तशी केंद्रांवर मतदारांच्या पुन्हा रांगा लागलेल्या दिसल्या.
‘व्हीव्हीपॅट’ यंत्रणेमुळे मतदान प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागत होता. मतदारांनी मत दिल्यानंतर पावती प्रिंट होऊन ती खोक्यात पडण्यासाठी सात सेकंदाचा वेळ लागत होता. एका मतदान केंद्रात साधारण पाच बूथ होते. प्रत्येक बूथवर जवळपास २५०० मतदार असतात. त्यांपैकी सरासरी ५० टक्के मतदारांनी हक्क बजावला तरी, १२०० मतदारांचे मतदान पूर्ण होण्यास ८४०० सेकंद अर्थात १४० मिनिटे (२ तास २० मिनिटे) अतिरिक्त लागले. व्हीव्हीपॅटपोटी लागलेल्या या अतिरिक्त वेळेमुळे मतदान प्रक्रियेस वेळ लागला व मतदारांना ताटकळावे लागले.