मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह निलंबित

 

मुंबई प्रतिनिधी | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नियमांचं उल्लंघन करणार्‍या परमबीर सिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल असं याआधी सांगितलं होतं. बेशिस्त वर्तन आणि अनियमितता यासाठी परमबीर सिंह यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या प्रक्रियेत आम्ही आहोत. त्यांच्यावरील निलंबनाची कारवाईची प्रक्रियादेखील सुरु आहे, असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानुसार आज अधिकृतपणे कारवाई करण्यात आली.

मार्च २०२० मध्ये मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि इतर दोन पोलीस अधिकार्‍यांना शहरातील बार मालकांकडून महिन्याला १०० कोटी वसूल करण्याचा आदेश दिला होता असा गंभीर आरोप करत खळबळ माजवून दिली होती. परमबीर सिंह यांच्या पत्रानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्याविरोधात अनेक तपास यंत्रणांकडून चौकशी सुरु असून सध्या ते जेलमध्ये आहेत.

दरम्यान, खंडणीच्या गुन्ह्यांत फरार घोषित करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह सुमारे सहा महिन्यांच्या अज्ञातवासानंतर अखेर मुंबईत पोलिसांसमोर ते चौकशीसाठी हजर झाले होते. यानंतर आता त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

Protected Content