मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | चार राज्यांमधील विजयाने हुरळून न जाता सर्वांनी आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सज् ज होऊन महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पक्षाच्या कार्यालयात जंगी स्वागत केल्यानंतर ते बोलत होते.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पक्षाच्या प्रदेश कार्यालयात अतिशय जोरदार स्वागत करण्यात आले. यानंतर उपस्थित नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना त्यांनी आगामी निवडणुकांसाठी रणशिंग फुंकले.
याप्रसंगी फडणवीस म्हणालेत की, कोणत्याही लढाईने हुरळून जाऊ नका. विजयाने नम्र व्हायचं आहे. आम्हाला मुंबईला कोणत्याही पक्षापासून मुक्त करायचे नाही. आम्हाला मुंबईला भ्रष्टाचारापासून मुक्त करायचे आहे. आम्ही कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात मैदानात उतरलो आहोत. जोपर्यंत भ्रष्टाचाराच्या विळख्यातून या मुंबईला बाहेर काढत नाही तोपर्यंत दम घेता येणार नाही. म्हणून हा विजय आज साजरा करा. उद्यापासून कामाला लागा. पुन्हा एकदा मुंबईत विजय मिळविण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सुध्द भाजपचे सरकार आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगत महाविकास आघाडीवर कडाडून टीका केली.