जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील सागर पार्कवर पार पडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चषक स्पर्धेत मुंबई आणि पुण्याच्या संघांनी अजिंक्यपद पटकावले.
जळगावातील येथील सागर पार्क मैदानावर काल रात्री उशीरापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीक कबड्डी स्पर्धा रंगली. यात महिलांच्या अंतिम सामन्यात पुण्याने मुंबई उपनगरचा प्रतिकार ३७-२८ असा मोडून काढत रोख रु. एक लाख पन्नास हजार व छत्रपती शिवाजी महाराज चषक आपल्या नावे केला. उपविजेत्या उपनगरला चषक व रोख रु. एक लाख मिळाले. पहिल्या डावात लोण देत २०-१६ अशी आघाडी घेणार्या पुण्याने दुसर्या डावात आणखी एक लोण देत ९गुणांच्या फरकाने आपला विजय साकारला. निकिता पडवळ, आम्रपाली गलांडे यांच्या संयमी चढाया, त्याला साक्षी गावडे, पूजा शेलार यांनी उत्कृष्ट पकडी करीत दिलेली मोलाची साथ यामुळे पुण्याला हे शक्य झाले. उपनगरच्या हरजित कौर संधू हिला अन्य खेळाडूंची म्हणावी तशी साथ मिळाली नाही. त्यांच्या शुभदा खोत, प्रणाली नागदेवता यांचा या सामन्यात प्रभाव पडला नाही.
यानंतर, पुरुषांच्या अंतिम सामन्यात मुंबई शहरने अहमदनगरचे आव्हान २८-२५ असे परतवून लावत छत्रपती शिवाजी महाराज चषक व रोख रु. एक लाख पन्नास हजार आपल्या खात्यात जमा केले. उपविजेत्या अहमदनगरला चषक व रोख रु. एक लाख(छ१,००,०००/-)वर समाधान मानावे लागले.