राज्यात सध्या ‘मुका घ्या मुका’ चित्रपट सुरू आहे ! : राऊतांची खोचक टिका

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्यात सध्या मुका घ्या मुका चित्रपट सुरू असल्याची शेलक्या शब्दांमध्ये टिका करत खासदार संजय राऊत यांनी पुन्हा या प्रकरणी शिंदे गटावर टिका केली आहे.

शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे आणि पदाधिकारी शीतल म्हात्रे यांच्या कथित व्हिडीओचे प्रकरण वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलतांना यावर खोचक भाष्य केले आहे. ते म्हणाले की, मुंबईत व्हिडीओचं प्रकरण सुरू आहे. मुका घ्या मुका नावाचा सिनेमा सुरू आहे. आज दादा कोंडके हवे होते. त्यांचा सिनेमा गाजला होता. मुका घ्या मुका. मुका घ्या मुका प्रकरणात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना का अटक करता? त्यांचा संबंध काय? हा सत्तेचा गैरवापर आहे. पोलीस यंत्रणेचा गैरवापर आहे. तुमच्या मुका प्रकरणात शिवसैनिकांचा संबंध काय? आम्ही सांगितलं का सार्वजनिक कार्यक्रमात मुका घ्यायला? मुळात तो व्हिडीओ खरा की खोटा हे आधी समोर येऊ द्या. मॉर्फींगचा विषय नंतर येईल. मी तो व्हिडीओ पाहिला नाही. पण मला असंख्य कार्यकर्ते फोन करत आहेत. आमच्या घरावर पोलीस आले. आमच्या कार्यालयात पोलीस आले, असं कार्यकर्ते सांगत असल्याचे संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, राऊत पुढे म्हणाले की, तो व्हिडीओ आमदाराच्या मुलानं शेअर केला. त्याला अटक केली का? नाही ना? मग कुणाची बदनामी करत आहात? तुमच्या पक्षातील अंतर्गत भांडणं असतील तर तुम्ही मिटवा. शिवसेनेला लक्ष्य करू नका. प्रकाश सुर्वे यांनी या प्रकरणी बोललं पाहिजे. मुका घेणारे पहिले गुन्हेगार तेच आहेत. तुम्ही काहीही करा. मुका घ्या किंवा मिठ्या मारा. सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करणार्‍यांवर गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

Protected Content