‘त्या’ महिलेची हत्याच ! : दागिन्यांच्या लोभासाठी बाप-लेकाचे कृत्य

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कुंड गावाजवळ मृतदेह आढळलेल्या महिलेची हत्याच झाली असून यातील दोन आरोपी निष्पन्न झाले आहे.

सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा

या संदर्भातील वृत्त असे की, दिनांक २९ ऑगस्ट रोजी तालुक्यात एका महिलेचा मृतदेह अतिशय भयंकर अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली होती. संत मुक्ताई साखर कारखान्याच्या पुढे कुंड गावाजवळ असणार्‍या पुलाच्या खालील बाजूस एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. तिची अतिशय क्रूरपणे हत्या केल्यानंतर त्या महिलेचा मृतदेह हा जाड प्लॅस्टीकच्या कॅरीबॅग्जमध्ये भरून तिथे टाकल्याचे आढळून आले होते. या महिलेची पहिल्यांदा ओळख पटली नव्हती.

पोलिसांनी या महिलेची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले होते. यात मलकापूर शहरातील एक महिला बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या महिलेचा पुत्र रितेश माधवराव फाळके याला सदर मयत महिलेचा फोटा दाखविला असता त्याने आपल्या आईला ओळखले. यानुसार या मयत महिलेचे नाव प्रभा माधवराव फाळके असल्याचे निष्पन्न झाले.

या महिलेच्या घराशेजारी भार्गव विश्‍वास गाढे आणि विश्‍वास भास्करराव गाढे यांच्याकडे त्यांचे येणेजाणे असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन झाडाझडती घेतली. यात मोबाईल लोकेशन, सीडीआर रिपोर्ट आणि सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे प्रभा फाळके ही महिला या दोघांसोबत गेल्यानंतर बेपत्ता झाली, आणि नंतर तिचा मृतदेह आढळल्याचे सिध्द झाले. यावरून भार्गव विश्‍वास गाढे आणि विश्‍वास भास्करराव गाढे या मलकापूर येथे राहणार्‍या बाप-लेकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, मयत प्रभा माधवराव फाळके या आपला मुलगा आणि सून यांच्यासोबत राहत होत्या. मात्र सुनेसोबत पटत नसल्याने त्या गाढे यांच्या कुटुंबात जास्त मिसळत होत्या. त्यांच्या अंगावरील दागिन्यांमुळे गाढे पिता-पुत्राने त्यांनी डोक्यात रॉड टाकून हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह मुक्ताईनगर तालुक्यात आणून टाकल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. यातून भार्गव गाढे याला अटक करण्यात आली असून विश्‍वास गाढे यांना ताब्यात घेण्यासाठी पथक रवाना झाले असल्याची माहिती पोलीस निरिक्षक शंकरराव शेळके यांनी दिली आहे.

ही कारवाई पोलीस निरिक्षक शंकरराव शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक प्रदीप शेवाळे, राहूल बोरकर, गणेश मनुरे, संतोष नागरे, धर्मेंद्र ठाकूर, नितीन चौधरी, देवसिंग तायडे. कांतीलाल केदारे, मंगल पारधी, राहूल बेहनवाल, रवी धनगर, मुकेश घुगे आदींनी एलसीबी जळगाव आणि मलकापूर पोलिस पथकाच्या सहाय्याने केली.

Protected Content