मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विशेष पोलीस महानिरिक्षकांच्या पथकाने तालुक्यातून एका पीकअप वाहनातून तब्बल १७ लाख रूपयांच्या गुटख्यासह तब्बल २१ लाखांचा ऐवज जप्त केल्याने खळबळ उडाली आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातून अवैध गुटख्याची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याचे आधी देखील दिसून आले आहे. विशेष करून या भागातूनच आंतरराज्यीय गुटखा तसेच अन्य प्रतिबंधीत पदार्थांची वाहतूक होत असल्याची चर्चा नेहमीच रंगत असते. याच अवैध गुटख्यावर आज नाशिक येथील विशेष पोलीस महानिरिक्षक अर्थात आयजींच्या पथकाने धडक कारवाई केली.
यात आयजी यांचे पथक हे तालुक्यात गस्त घालत असतांना त्यांना मुक्ताईनगर ते बर्हाणपूर या मार्गावर एमएच१९ बीएम ५४०० या पीकअप वाहनातून अवैध गुटखा नेला जात असल्याची माहिती मिळाली. या अनुषंगाने रात्री पथकाने सापळा रचला. काल मध्यरात्रीच्या सुमारास आरटीओ चेक पोस्टजवळ सदर वाहनाची तपासणी केली असता यात तब्बल १७ लाख रूपयांचा गुटखा आढळून आला. हा गुटखा आणि चार लाख रूपयांचे वाहन असा एकूण २१ लाख रूपयांचा ऐवज आयजींच्या पथकाने जप्त केला आहे.
दरम्यान, या वाहनावरील चालक चेतन सुभाष झांबरे ( वय ३२, रा. कोथळी, ता. मुक्ताईनगर) आणि त्याच्या सोबतचा व्यक्ती हा विनायक मनोहर चांदेलकर ( वय १९, रा. बोदवड) हे असल्याचे दिसून आले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अवैध गुटख्याचा साठा हा अनुपम गोसावी ( रा. मुक्ताईनगर) याच्या मालकीचा असल्याचे निष्पन्न झाले. या अनुषंगाने मुक्ताईनगर पोलीस स्थानकात या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.