जळगावात एटीएम तोडणारे दोन चोरटे फरार

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिवकॉलनी उड्डाण पुलाजवळचे एटीएम तोडून तब्बल १४ लाखांची कॅश चोरणार्‍या दोन आरोपींनी हरियाणातील कारागृहात हस्तांतरीत करण्याआधीच पलायन केल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे आता चोरीच्या तपासात अडथळे निर्माण होणार आहे.

याबाबत वृत्त असे की, शिवकॉलनी रेल्वे उड्डाण पुलाच्या अलीकडे स्टेट बँकेची शाखा आहे. याच्या बाहेर एक एटीएम सेंटर आहे. त्यात कॅश भरणा आणि एटीएम अशी दोन एटीएमची मशीन आहेत. १२ जुलै रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हे दोन्ही एटीएम तोडण्यात आले. यात संबंधीत एटीएम हे गॅस कटरने तोडून चोरट्यांनी यामध्ये असणारी १४ लाख ४१ हजार रूपयांची कॅश लांबवून पोबारा केल्याचे स्पष्ट झाले होते. तर या एटीएममध्ये असणारी सात लाख रूपयांची रोकड मात्र चोरट्यांना न दिल्याने सुरक्षित राहिली होती. भर वस्तीमधील एटीएम फोडून तब्बल १४ लाखांची रक्कम लंपास करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली होती.

या प्रकरणी निसार सखू सैफी (वय ३९) व इरफान सखू सैफी (वय २९, दोघे रा.साफेता, ता.गणपूर, हरियाणा) अशा दोन आरोपींना हरियाणा पोलिसांनी अटक केली होती. हे दोघे सख्खे भाऊ आहेत. तर कुर्शीद मदारी सैफी (वय ३७, रा.अंघोला हतीम, पलवल, दिल्ली) हा मास्टर माइंड मात्र अटक होण्याआधी पळून जाण्यात यशस्वी झाला होता.

जळगावातील एटीएम चोरीचा तपास पूर्ण करून त्यांना हरियाणा राज्यातील निमका येथील कारागृहात पोहचवण्यात आले. यासाठी जिल्हापेठचे एक पथक या दोन्ही आरोपींना घेऊन गेले होते. स्थानिक कारागृह प्रशासनाने त्यांची कोविड टेस्ट करून मगच जेलमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश दिले. या अनुषंगाने दोन्ही आरोपींना घेऊन पोलीस पथक एका हॉटेलमध्ये राहिले. तेथूनच या दोन्ही आरोपींनी पळ काढला. ही घटना बुधवारी पहाटे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

Protected Content