राज्य सरकारची अब्रू चव्हाट्यावर आली- गिरीश महाजन

जळगाव प्रतिनिधी । सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने राज्य सरकारची अब्रू चव्हाट्यावर आल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडी सरकार आपल्या कर्मानेच पडणार असल्याचे भाकित देखील त्यांनी केले आहे.

आज सुप्रीम कोर्टाने अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा संदर्भ घेत माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी राज्यातील महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

आज पत्रकारांशी बोलतांना आ. गिरीश महाजन म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील महाविकास आघाडीला मोठी चपराक दिलेली आहे. वास्तविक, राज्य सरकारने ही वेळ येऊ द्यायलाच नको होती. अभिनेता सुंशातसिंह यांच्या घरच्यांनीच जर सीबीआय तपासाची मागणी केली होती तर त्याच वेळेस सरकारने पोलिसांकडून तपास काढून सीबीआयकडे देण्याची गरज होती. त्याला काहीच हरकत नव्हती. परंतु राज्य सरकारचा नेमका हेतू काही कळला नाही.

आ. गिरीश महाजन पुढे म्हणाले की, भाजप महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप सत्ताधारी करतात. मात्र, भाजपला राज्य सरकार पाडण्याची कोणतीही गरज नाही. सध्या राज्यातील स्थितीवरून हे सरकार भरकटलेले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ते त्याच्या कर्मानेच पडेल, असेही महाजन म्हणाले. राज्य शासनाने सीबीआयकडे तपास दिला तर नाहीच, उलट शिवसेनेचे खासदार संजय राऊत वेगवेगळे वक्तव्य करीत आहेत. त्यामुळे खासदार राऊतांचे डोके ठिकाणावर आहे काय, असेच म्हणावे लागेल असा टोला गिरीश महाजन यांनी मारला.

Protected Content