मुक्ताईनगर-पंकज कपले | तालुक्यातील दुई शिवारात वाघाने फडशा पाडलेल्या गोर्ह्याचा पंचनामा करण्यासाठी गेलेल्यांना वाघाच्या डरकाळीने परत फिरावे लागल्याची घटना घडली आहे.
मुक्ताईनगर तालुक्यात पट्टेदार वाघाचा मुक्त संचार असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. अलीकडेच दुई शिवारात भर रस्त्यावरच वाघोबांनी ठाण मांडून बसल्याचे अनेकांनी पाहिले होते. यातच वाघाचा मुक्त संचार असलेल्या आई मुक्ताई -भवानी (वडोदा वनक्षेत्र) वनक्षेत्रातील डोलारखेडा वनपरीमंडळातील मौजे दुई येथील पशुपालक धोंडु डोंगर पाटील यांच्या गोर्हावर हल्ला चढवत वाघाने ठार केल्याची घटना काल म्हणजेच २० मे रोजी घडली.
दरम्यान, ही घटना घडल्यानंतर आज प्रभारी वनक्षेत्रपाल ए. आर. बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली मृत गोर्ह्याचा पंचनामा करण्यासाठी व सदर ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यासाठी वनपाल डोलारखेडा पी. टी. पाटील यांच्यासह वनमजुर संजय सांगळकर,धोंडु पाटील,प्रदिप पाटील,हर्षल पाटील, कृष्णा पाटील, अनिल पाटील आदी वाघाने शिकार केलेल्या ठिकाणी पोहचले.
दरम्यान, संबंधीत या परिसरात पोहचताच वाघाने जोरदार डरकाळी फोडली. या डरकाळीने सर्वजण भयभयीत झाले.सर्वांची भांबेरी उडाली.घनटाद जंगलातुन पायवाटेवर असलेल्या या सर्व जणांनी तात्काळ पळ काढला. याप्रसंगी दोन ग्रामस्थ पळतांना खाली पडल्याने किरकोळ जखमी झाले. पंचनामा करण्यासाठी वनाधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले असतांनाच या परिसरात वाघ गोर्हाचे मांस खात असल्याची शक्यता वन अधिकार्यांनी याप्रसंगी व्यक्त केली. यामुळे आता पंचनाम्याचे सोपस्कार हे नंतर पार पडणार असल्याची माहिती वन खात्यातर्फे देण्यात आली आहे.