नाथाभाऊ ‘नॉट रिचेबल’ : राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे गेल्या काही दिवसांपासून ‘नॉट रिचेबल’ येत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

आमदार एकनाथराव खडसे यांचा फोन हा नॉट रिचेबल येत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आल्याचे वृत्त टिव्ही नाईन मराठी या वृत्तवाहिनीने दिले आहे. या वृत्तानुसार, गेल्या ८ दिवसांपासून एकनाथ खडसे नॉच रिचेबल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
एकनाथ खडसे यांचा कार्यकर्त्यांशी संपर्क झालेला नसल्याचेही या वृत्तात म्हटले आहे. नेहमी कायम मोबाईलद्वारे संपर्कात असणार्‍या नाथाभाऊंशी संपर्क होत नसल्याने समर्थक अस्वस्थ झाल्याचे या बातमीत म्हटले आहे.

दरम्यान, या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या प्रतिनिधीने खासदार रक्षाताई खडसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताबाबत काही माहिती नसल्याचे सांगितले. तर एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक अशोक लाडवंजारी यांनी नाथाभाऊ हे आजारी असल्याने मुंबईत उपचार घेत असल्याचे सांगितले. नाथाभाऊंचे व्याही मनीषराव खेवलकर यांच्या अंत्यसंस्कारातही ते याचमुळे सहभागी झाले नसल्याची माहिती लाडवंजारी यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजशी बोलतांना दिली. तर, आम्ही रोहिणीताई खडसे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

दरम्यान, लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या माहितीनुसार एकनाथराव खडसे यांच्यावर रूग्णालयात पायाच्या दुखण्याशी संबंधीत उपचार करण्यात आले आहेत. यानंतर त्यांनी काही दिवस फार लोकांमध्ये न जाता विश्रांती घ्यावी असा सल्ला डॉक्टर्सनी त्यांना दिला आहे. यामुळे ते विश्रांती घेत आहेत.

Protected Content