मुक्ताईनगर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | प्रशासकीय कामकाजात गैरवर्तन, अनियमितता आणि सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून पदभार असतांना परस्पर आदेश पारित करून शिस्तभंग केल्याप्रकरणी येथील पंचायत समिती ग्राम पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी राजकुमार जैन यांच्यासह कुर्हा येथील ग्रामसेवक विनायक पाटील या दोघांना गटविकास अधिकार्यांनी लेखी आदेशद्वारे निलंबित केल्याने खळबळ उडालेली आहे.
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस. आर. नागटीळक यांनी सोमवारी निलंबनाचे आदेश काढले आहे. निलंबन काळात राजकुमार जैन यांचे मुख्यालयात पंचायत समिती मुक्ताईनगर येथेच रहाण्याचे आदेश देण्यात आले आहे.
राजकुमार जैन हे येथील पंचायत समितीत विस्तार अधिकारी (ग्राप) यापदावर कार्यरत असतांना प्रशासकीय कामकाजात गैरवर्तवणुक, कामकाजात अनियमितता तसेच कार्यालयीन कामकाजात हलगर्जीपणा केल्यामुळे प्रशासकीय कामकाजास अडचण निर्माण केली असा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच त्याच्याकडे सहाय्यक गटविकास अधिकारी पदाचा पदभार असतांना त्यांनी परस्पर आदेश पारित करून सेवा शर्तीचे उल्लंघन केले. तसेच पं.स. अंतर्गत विविध योजनांवर नियंत्रण अधिकारी म्हणून आपली जवाबदारी योग्यपणे पार पाडली नाही असा ठपका त्यांच्या निलंबन आदेशात ठेवण्यात आला आहे.तत्पुर्वी जैन यांची खाते चौकशी झाली. त्यात विविध नोंदी घेण्यात येऊन अहवाल जि. प. प्रशासनाकडे पाठविण्यात आला होता.
चौकशी अहवालावरून जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा. प.) दिगंबर लोखंडे यांनी हे आदेश पारित केले. हे आदेश येथे प्राप्त होताच खळबळ उडाली आहे. सोमवारी ३१ रोजी गटविकास अधिकारी नागटीळक यांनी जैन यांच्या निलंबनाचे आदेश दिले. या निलंबन कारवाई मुळे खळबळ उडाली आहे. वडोदा ग्रामपंचायतीच्या ग्राम विस्तार अधिकार्याने कोरोना बाधित सुटीवर असतांना ई टेंडर काढल्या प्रकरणी संबंधितांवर कारवाई ची टांगती तलवार असल्याची चर्चा असतांना विस्तार अधिकारी यांना निलंबीत करण्यात आले आहे.