मालमत्तांच्या फेरमूल्यांकनाला भाजपचा विरोध

जळगाव, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महापालिकेने शहरवासियांवर लादलेल्या मालमत्तांच्या फेरमूल्यांकनाला विरोध करत आंदोलन उभारण्याची तयारी भारतीय जनता पक्षाने केली आहे. यामुळे एकीकडे मार्च अखेरीस कर वसुलीचे आव्हान असणार्‍या महापालिका प्रशासनाच्या समोरील अडर्चीी वाढणार आहेत.

मनपाच्या माध्यमातून मालमत्तांचे फेरमूल्यांकन करण्यात आले आहे. त्यात मालमत्ता कराच्या रकमांत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढीस लागला आहे. या अनुषंगाने मालमत्ता करांच्या फेरमूल्यांकनावरून आता भारतीय जनता पक्ष आक्रमक होणार असल्याचे संकेत पक्षाच्या बैठकीत देण्यात आले आहेत. पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे आणि महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी बैठकीत याबाबत सूचना दिल्या आहेत.

शहरातील नागरीकांना वाढीव कराच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. अनेक घरांच्या बांधकामात कोणताही बदल झालेला नसताना त्यांच्या करात वाढ झाली आहे. कराच्या रकमेत झालेली वाढ ही अवाजवी असल्याच्या तक्रारी आहेत. नागरीकांचा रोष लक्षात घेता भाजपने या मालमत्ता कराच्या रकमेत वाढीला विरोध करण्यात यावा असे भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत ठरविण्यात आले.

मालमत्ता करात झालेल्या वाढीच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून लवकरच आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. या अनुषंगाने बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती पदाधिकार्‍यांनी दिली आहे. या बैठकीला पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे, सरचिटणीस डॉ. राधेश्याम चौधरी, नगरसेवक विशाल त्रिपाठी यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

Protected Content