माजी शिक्षणाधिकार्‍यांवर शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव

जळगाव प्रतिनिधी । माध्यमिक विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी डी. पी. महाजन यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून शिक्षण आयुक्त कार्यालयाला पाठविण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, माजी माध्यमीक शिक्षणाधिकारी डी. पी. महाजन हे वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. त्यांनी तक्रारदाराने माहिती अधिकारात मागितलेली माहिती दिली नाही. त्यानंतर माहिती आयुक्तांकडे झालेल्या सुनावणीला देखील उपस्थित न राहता तत्कालीन शिक्षणाधिकारी डी. पी. महाजन यांनी शिस्तभंग केला. माहिती अधिकार कायद्यानुसार संबधितांना माहिती देणे बंधनकारक असून देखील शिक्षणाधिकारी महाजन यांनी जाणीवपूर्वक कर्तव्यात कसूर केला. त्यांनी राज्य माहिती आयुक्तांना देखील योग्य खुलासा दिला नाही. त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश माहिती आयुक्तांनी दिले होते.

या अनुषंगाने शिक्षण विभागाने सादर केलेल्या प्रस्तावावर स्वाक्षरी करून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी राज्याच्या शिक्षण आयुक्तांकडे महाजन यांच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. यामुळे आता डी. पी. महाजन यांच्यावर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content