मुक्ताईनगर- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील उपजिल्हा रूग्णालयाच्या श्रेणीवर्धनाला मान्यता मिळाल्याने येथे १०० खाटांची व्यवस्था होणार आहे. आमदार चंद्रकांत पाटलांच्या पाठपुराव्याने याचा परिसरातील रूग्णांना लाभ होणार आहे.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत उपजिल्हा रूग्णालयातील श्रेणीवर्धनाबाबत माहिती दिली.या संदर्भात आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालय हे पूर्वी ५० खाटांचे होते. मुक्ताईनगर तालुक्याचे ठिकाण असून ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ व इंदूर-औरंगाबाद या दोन महामार्गांवर आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात बाहेरगावाहून उपचारासाठी येणार्या रुग्णांची संख्या, महामार्गावर रोज होणारे अपघात, यामुळे येथे रोजचे रुग्ण व अपघातग्रस्तांनाही वेळेवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या कमतरतेमुळे पुरेशी सेवा सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होत नसल्याने रुग्णास पुढील उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवावे लागते. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात १०० खाटांचा श्रेणी वर्धन प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करून मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू होता. त्या प्रस्तावाला हिरवी झेंडी मिळाल्याने मतदारसंघातील आरोग्याच्या समस्या असल्याचे प्रतिपादन आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले. जिल्हा रुग्णालयाच्या सम तुल्य अशा सर्व सोयी या १०० खाटांच्या रुग्णालयासाठी मिळणार असून ब्लड स्टोरेज युनिट तंत्रज्ञानासह उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदारांनी दिली.
दरम्यान, यासोबत मुक्ताईनगर शहरासाठी २६ कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेला तांत्रिक मंजुरी मिळाली असल्याची माहिती देखील आमदार चंद्रकांत पाटील यांनी याप्रसंगी दिली. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महा अभियान अंतर्गत ही योजना मंजूर करण्यात आली असून वाढीव निधी व मान्यतेसाठी प्रयत्न केला जात आहे. शिरपूरच्या धर्तीवर आधारित ‘सेट लिंक टँक’सह इतर सुविधांसाठी पाणीपुरवठा योजना वाढीव निधीद्वारे जवळपास ५० कोटी मंजूर करण्याचा मानस असल्याचे याप्रसंगी आमदार पाटील, पाणीपुरवठा सभापती मुकेश वानखेडे यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला मुक्ताईनगरचे पाणीपुरवठा सभापती मुकेश वानखेडे, स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी, नगरसेवक संतोष मराठे,निलेश शिरसाठ, आरिफ आझाद नूर मोहम्मद आणि युनूस खान उपस्थित होते.