पीक अप व्हॅनची दुचाकीला धडक : तरूण ठार, एक जखमी

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आजारी असलेल्या आईला पाहून घरी जाणार्‍या युवकाच्या दुचाकीला पीक अप व्हॅनने दिलेल्या धडकेत त्याचा मृत्यू झाला असून त्याच्या सोबतचा तरूण जखमी झाला आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, मालेगाव येथील संगमेश्वर परिसरातील माळी नगरमधील कार्तिक प्रवीण महाजन (वय २१) हा त्याचा मित्र गौरव वाघ याला सोबत घेऊन आईला पाहण्यासाठी रुग्णालयात आला होता. आईला पाहिल्यानंतर होंडा स्प्लेंडर (एमएच- ४१, एपी- ६३०१)या दुचाकीने ते अमळनेरहून मालेगाव कडे परत जात असतांना धुळे रस्त्यावरील कलागुरु मंगल कार्यालयाजवळ धुळ्याकडे जाणार्‍या अज्ञात मालवाहू पिकअप व्हॅनने त्यांच्या दुचाकीला मागून जबर धडक दिली.

या अपघातात कार्तिकचा जागीच मृत्यू झाला. तर गौरव वाघ हा जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी धुळे येथे दाखल करण्यात आले आहे. हा अपघात बुधवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास घडला. दरम्यान, घटनास्थळावरून पीकअप व्हॅन चालक पसार झाला आहे. या प्रकरणी नंदकुमार महाजन यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चालकाविरुद्ध अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content