Home Cities अमळनेर अखेर अमळनेर तालुक्यातील बिबट्या जेरबंद! 

अखेर अमळनेर तालुक्यातील बिबट्या जेरबंद! 

0
6

अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील अंतुर्ली, रंजाणे, हिंगोणे यासह विविध गावांच्या परिसरात दहशत निर्माण करणारा बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. चार ते पाच जनावरांचा फडशा पाडणाऱ्या या बिबट्याच्या वावरामुळे नागरिक आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वनविभागाने सातत्याने गस्त घालत आणि बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवत अखेर १६ ऑक्टोबर रोजी पहाटे त्याला पकडण्यात यश मिळवले. आता या बिबट्याला नेमके कुठे सोडायचे, याबाबत वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी निर्णय घेणार आहेत.

अमळनेर तालुक्यातील शिरूड, मंगरूळ, पिंपळे, ढेकू रस्ता, धार रस्ता, अंतुर्ली, रंजाणे, ताडेपुरा आणि टाकरखेडा परिसरात बिबट्याचा वावर आढळून येत होता. या बिबट्याने चार ते पाच जनावरे फस्त केल्याने शेतकरी आणि पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. बिबट्याच्या सततच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. त्यामुळे बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने विविध ठिकाणी पिंजरे लावून त्याच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले होते. वनपरिक्षेत्र अधिकारी छत्रपती चव्हाण, उपवनसंरक्षक राम धोत्रे आणि सहाय्यक वनसंरक्षक अमोल पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याला पकडण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. वनपाल गुलाब पिंजारी, वनरक्षक दुर्गादास वानखेडे, योगेश पाटील, मनीषा मोरे तसेच वनमजूर प्रवीण पाटील, समाधान पाटील आणि मयूर पाटील हे कर्मचारी नियमितपणे परिसरात गस्त घालत होते.

बिबट्या सतत वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असल्याने त्याला पकडण्यासाठी वनविभागाच्या पथकाला विशेष दक्षता घ्यावी लागत होती. वनपाल गुलाब पिंजारी हे आपल्या कर्मचाऱ्यांसह रात्री उशिरापर्यंत तसेच पहाटेच्या वेळीही गस्त घालत होते. बिबट्याच्या हालचालींचा अंदाज घेऊन पिंजऱ्यांच्या जागेतही वेळोवेळी बदल करण्यात येत होते. बिबट्याला पिंजऱ्याकडे आकर्षित करण्यासाठी माजी नगरसेवक मुख्तार खाटीक यांनी शेळ्या उपलब्ध करून दिल्या, तर सरपंच सचिन पाटील यांनीही या मोहिमेत सहकार्य केले. वनविभागाच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश आले. १६ ऑक्टोबर रोजी पहाटे तांबेपुरा-अंतुर्ली रस्त्यावरील पिंजारी मुस्लिम कब्रस्थान परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला. बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आता बिबट्याला कोणत्या ठिकाणी सोडायचे, याबाबत वरिष्ठ अधिकारी परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेणार आहेत.


Protected Content

Play sound