शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात जेष्ठ नागरिकांसाठी ओपीडी सुरु

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्ताने रुग्णालयात जेष्ठ नागरिकांसाठी विशेष ओपीडी सुरु करण्यात आली आहे. सुरुवात शनिवारी १ ऑक्टोबर रोजी सकाळी करण्यात आली. प्रसंगी स्वतंत्र सुविधा सुरु झाल्याने जेष्ठ नागरिक मंडळांनी आभार मानले आहे.

जागतिक जेष्ठ नागरिक दिनानिमित्त औषधवैद्यक शास्त्र विभागातर्फे जेष्ठ नागरिकांच्या ओपीडीचा प्रारंभ अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते कक्ष १०८ येथे फित कापून करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, डॉ. नरेंद्र पाटील, डॉ. गणेश लोखंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

ओपीडीत जेष्ठ नागरिकांना असणारे दुर्धर आजार, हाडांच्या आजारांच्या समस्या, डोळे-कान-नाक-घसा आदी तपासणी करून मिळणार आहे. सकाळी ९ ते दुपारी १ वाजेदरम्यान आराेग्य तपासणीसाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. ६५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या वृद्धांना आधारकार्ड दाखवल्यास केसपेपर मूल्य द्यावे लागत नाही. जेष्ठांना तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध होत असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांनी दिली.

यावेळी ओम् शांती ज्येष्ठ नागरिक संघ यासह इतर संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांचा सन्मान अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केला. प्रसंगी जेष्ठ नागरिक रामदास विठल मोते यांनी जेष्ठांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल रुग्णालय प्रशासनाचे आभार मानले.

डॉ. जयप्रकाश रामानंद म्हणाले की, जेष्ठ नागरिकांना आरोग्याच्या समस्या सातत्याने भेडसावत असतात. त्यांच्यासाठी स्वतंत्र ओपीडी झाल्याने तपासणी सुटसुटीत पद्धतीने करता येणार आहे. जेष्ठांसाठी सर्वांगीण आरोग्यसेवा देण्याचा पूर्ण प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.

सूत्रसंचालन डॉ. नेहा चौधरी यांनी तर आभार डॉ. स्वप्नील चौधरी यांनी मानले. यावेळी डॉ. हर्षल महाजन, डॉ. डॅनियल साजी, समाजसेवा अधीक्षक डॉ. संदीप बागुल, डॉ. सुनयना कुमठेकर, जनसंपर्क सहायक विश्वजित चौधरी यांच्यासह मुलचंद सरोदे, कडू दगडू पालवे, तुकाराम ढाके, पी.जी. नारखेडे, डी. आर.पाटील, मधू पाटील, दगडू चौधरी आदी जेष्ठ नागरिक उपस्थित होते. यशस्वीतेसाठी डॉ. आस्था गणेरीवाल, डॉ. निशी शाह, डॉ. स्वप्नील चव्हाण, डॉ. अमित भंगाळे, डॉ. तुषार सोनवणे, डॉ. गजानन परखड, डॉ. ऋषिकेश येऊळ, भालचंद्र कुंवर, भूषण निकम, राजू सपकाळ आदींनी परिश्रम घेतले.

Protected Content