डॉक्टर कॅबिनमध्ये…नगराध्यक्ष बनले गरोदर महिलेच्या वाहनाचे सारथी !

धरणगाव प्रतिनिधी । वेदनेने तळमळणार्‍या गरोदर महिलेची प्रसूती करण्यास येथील ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी गिरीश चौधरी यांनी साफ नकार देऊन ते स्वस्थपणे कॅबिनमध्ये बसून राहिले. तर, नगराध्यक्ष निलेश चौधरी हे आपल्या वाहनातून या महिलेस खासगी डॉक्टरकडे घेऊन गेल्याची घटना आज शहरात घडली.

याबाबत वृत्त असे की, साळवा शहरातील एका महिलेस प्रसूतीकळा सुरू झाल्या. यामुळे तेथील आशा स्वयंसेविकेने या महिलेस धरणगाव येथील ग्रामीण रूग्णालयात आणले. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश चौधरी यांनी तिने जिल्हा रूग्णालात जाण्याचा सल्ला देऊन या महिलेची प्रसूती करण्यास नकार दिला. यावर त्या महिलेला सिव्हीलमध्ये पाठविण्यासाठी रूग्णवाहिका देण्याची मागणी केली. मात्र याला देखील नकार देण्यात आला. यामुळे संबंधीत महिला ही अक्षरश: तळमळत राहिली. हा प्रकार पाहून अखेर साळवा येथील पंक्चर झालेली अँबुलन्स कशी तरी धरणगाव येथे आणली गेली. तेथे एका मेकॅनिकला गाठून त्याच्याकडून पंक्चर काढण्यात आले.

दरम्यान, हा सर्व प्रकार लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या माध्यमातून जिल्ह्यात व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली. नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी तातडीने ग्रामीण रूग्णालयात धाव घेऊन डॉ. गिरीश चौधरी यांना संबंधीत महिलेची प्रसूती करण्याची विनंती केली. मात्र त्यांनी याला साफ नकार दिला. नगराध्यक्षांनी आपण स्वत: अँब्युलन्स चालवतो असे सांगितले तरी डॉ. चौधरी यांनी कोणताही रिस्पॉन्स दिला नाही. यामुळे शेवटी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी शहरातील डॉ. लिलाधर बोरसे यांना या महिलेची प्रसूती करण्याची विनंती केली. याला मान देऊन डॉ. बोरसे यांनी संबंधीत महिलेला दाखल करून घेण्याची तयारी दर्शविली. यामुळे निलेश चौधरी यांनी तातडीने स्वत: आपले वाहन चालवून या महिलेला डॉ. बोरसे यांच्याकडे दाखल केले.

दरम्यान, धरणगाव ग्रामीण रूग्णालयातील हा प्रकार अतिशय गंभीर असून यामुळे शहरासह जिल्ह्यातून संतापाची लाट उसळली आहे. खुद्द पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात शिवसेनेने रूग्णवाहिका दिली असतांना याचा वापर तर जाऊच द्या…पण प्रसूतीस नकार दिल्याने डॉ. गिरीश चौधरी यांच्यावर टीका करण्यात येत आहे. तर नगराध्यक्ष निलेश चौधरी व संबंधीत महिलेच्या प्रसूतीसाठी तयारी दर्शविणारी डॉ. लिलाधर बोरसे यांच्या मानवतावादी दृष्टीकोनाचे कौतुक केले जात आहे.

Protected Content