डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजात तीन दिवस मोफत शस्त्रक्रिया महाशिबिर !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शनिवार दि.११, रविवार दि.१२ व सोमवार दि.१३ फेब्रुवारी रोजी संपूर्ण आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया महाशिबिर आयोजित केले आहे. यात सर्व प्रकारच्या आजारांचे निदान, तपासणी, शस्त्रक्रिया ह्या मोफत केल्या जाणार आहेत.

रुग्णसेवा हिच ईश्‍वरसेवा हे ब्रिद जोपासत गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांनी ११ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत संपूर्ण आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया महाशिबिराचे आयोजन केले आहे. महाशिबिरात येणार्‍या रुग्णांना दाखल करुन घेत त्यांचे सीटी स्कॅन, एमआरआय, रक्त-लघवी चाचण्या संपूर्ण मोफत केल्या जाणार आहे.

या महाशिबिरात जनरल सर्जरीअंतर्गत व्हेरीकोज व्हेन्स, हायड्रोसिल, अपेंडीक्स, मुळव्याध, युरो सर्जरीत मुतखडा, प्रोस्टेट, न्यूरोअंतर्गत मेंदूतील रक्तस्त्राव, मेंदूतील गाठी तर कॅन्सर सर्जरीमध्ये स्तनाचा, मुखासह सर्व प्रकारच्या कर्करोगावर शस्त्रक्रिया, कान-नाक-घसा विभागाद्वारे कानातून पू येणे, डोळ्यातून घाण चिकट पाणी येणे, नाकाचे वाढलेले हाड याची तपासणी करुन त्यावरही रुग्णालयात इएनटी तज्ञांद्वारे शस्त्रक्रिया केल्या जाणार आहे. याशिवाय दुर्बिणीद्वारे गर्भपिशवी, कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया केल्या जातील. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत बसणार्या व न बसणार्‍या सर्व शस्त्रक्रिया महाशिबिरात मोफत केल्या जाणार आहे. रुग्णांनी सोबत येतांना ओरिजीनल आधार कार्ड व रेशन कार्ड घेवून यावे. अधिक माहितीसाठी आशिष भिरुड ९३७३३५०००९, रत्नशेखर जैन ७०३०५७११११ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे.

जनतेने महाशिबिराचा लाभ घ्यावा : डॉ. केतकीताई पाटील

दरम्यान, या संदर्भात डॉ. केतकीताई पाटील म्हणाल्या की, बहुतांशी आजारांवर वेळीच ट्रिटमेंट घेतली तर त्यातील गुंतागुंत कमी होते. रुग्णाच्या हितासाठी रुग्णालयाने ११ ते १३ फेब्रुवारी कालावधीत संपूर्ण आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया महाशिबिर घेतले आहे. यात योजनेत न बसणार्या शस्त्रक्रियाही मोफत केल्या जाणार आहे. तरी जनतेने या सेवेचा लाभ घेऊन व्याधीमुक्त व्हावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

Protected Content