जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील तुकारामवाडी येथील सचिन ऊर्फ टिचुकल्या कैलास चौधरी (वय २६) या कुख्यात गुन्हेगारावर एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत (महाराष्ट्र प्रतिबंधक स्थानबद्धता अधिनियम) जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे सचिन चौधरीला नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. ही माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाने मंगळवार, १ जुलै रोजी रात्री ८ वाजता दिली.
सचिन चौधरीविरुद्ध भारतीय दंड संहितेअंतर्गत ९ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी वर्तनात सुधारणा व्हावी, यासाठी यापूर्वी अनेक प्रतिबंधक कारवाई करण्यात आल्या होत्या. मात्र, त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही. त्यामुळे समाजातील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ही कठोर कारवाई आवश्यक ठरली.
तत्कालीन जिल्हापेठ पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी सचिन चौधरीवर एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. हा प्रस्ताव त्यांनी १६ जून रोजी स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव येथे सादर केला. या प्रस्तावाचे सखोल अवलोकन केल्यानंतर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ३० जून रोजी त्याला मंजुरी दिली आणि सचिन चौधरीला नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केले.
या आदेशानुसार, जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकुर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण, पोलीस हवालदार मिलींद सोनवणे आणि पोलीस हवालदार विकास पोहेकर यांच्या पथकाने सचिन चौधरीला ताब्यात घेतले आणि त्याला नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात दाखल केले. या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.