अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून अमळनेर तालुक्यात अवैध वाळू उपशाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. तापी, पांझरा आणि बोरी या नद्यांमधून मोठ्या प्रमाणात वाळूचा बेसुमार उपसा होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत होते. मात्र, यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासकीय यंत्रणेवर नाराजी व्यक्त होत होती. आता, उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध गौण खनिज उपसा करणाऱ्यांविरोधात कारवाईचा धडाका सुरू झाला आहे.
या कारवाईत पकडलेल्या लहान-मोठ्या वाहनांमुळे तहसील कार्यालयाला अक्षरशः यात्रेचे स्वरूप आले आहे. विशेष म्हणजे, तहसीलदार रुपेश कुमार सुराणा हे स्वतः रस्त्यावर उतरून अवैध वाळू उपशाविरोधात दंड थोपटताना आणि वाहने पकडताना दिसून येत आहेत, ज्यामुळे प्रशासकीय गतीने कामाला वेग आला आहे.
आजही (१ जुलै) तालुक्यात दोन ठिकाणी मोठी कारवाई करण्यात आली. मौजे बिलखेडे-सडावन रस्त्यावर सडावन गावाजवळ उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे आणि तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत वाळू वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर पकडण्यात आले. हे ट्रॅक्टर मुद्देमालासह अमळनेर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे. या पथकात मंडळ अधिकारी पी. एस. पाटील (वावडे भाग), ग्राम महसूल अधिकारी एम. आर. पाटील (मांडळ), जितेंद्र पाटील (शिरसाळे बु.) आणि विकेश भोई (बाम्हने) यांचा समावेश होता.
दुसऱ्या एका कारवाईत, हिंगोने खुर्द येथील गावाजवळ दोन अनधिकृत गौण खनिज रेती वाहतूक करणारे टेम्पो पकडण्यात आले. या कारवाईत मंडळ अधिकारी गौरव शिरसाठ, वाय. आर. पाटील आणि ग्राम महसूल अधिकारी अमोल पाटील यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. अवैध गौण खनिज विरोधात अधिकारी वर्गाने सुरू केलेल्या या धडक कारवाईचे तालुक्यातून मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे, ज्यामुळे अवैध धंद्यांना आळा बसेल अशी आशा निर्माण झाली आहे.