जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव: कामावर जाताना घराबाहेर एका डब्यात चावी ठेवून जाणे श्याम नगरमधील एका तरुणाला चांगलेच महागात पडले. ही संधी साधत चोरट्यांनी कुलूप उघडून घरातून तीन तोळे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना ३० जून रोजी दुपारी १२:३० ते रात्री ९ वाजेदरम्यान घडली असून, या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्याम नगर परिसरातील अंकित सूर्यभान पाटील (वय २४) हे खासगी नोकरी करतात. त्यांचे आई-वडील बाहेरगावी गेले असल्याने, ३० जून रोजी दुपारी अंकितने घराला कुलूप लावून त्याची चावी घराबाहेरच्या रांगोळीच्या डब्यात ठेवली आणि तो कामावर निघून गेला.
याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला. त्यांनी घरातील सामान अस्ताव्यस्त फेकले आणि देवघरातील पडदीवर ठेवलेल्या पिशवीतून तीन तोळे सोन्याची पोत व पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी असे एकूण ७० हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. रात्री अंकित पाटील घरी परतल्यावर ही चोरी झाल्याचे त्यांना समजले.
अंकित पाटील यांनी तातडीने रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली, त्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र राजपूत करत आहेत. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी ही घरफोडी झाली, त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने पोलिसांना कोणतेही महत्त्वाचे फुटेज मिळालेले नाही, त्यामुळे चोरट्यांचा शोध घेणे आव्हानात्मक बनले आहे.