रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील कोचुर खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच ज्योती संतोष कोळी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्या टोकरी कोळी जातीच्या बनावट दाखल्यासंबंधी ग्रामपंचायत सदस्य लीलाबाई घनश्याम तायडे यांनी पुराव्यानिशी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी जळगाव तहसीलदारांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सरपंच ज्योती कोळी यांनी जळगाव तालुका तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्यांचा वापर करून टोकरी कोळी जातीचा बोगस दाखला तयार केला आणि त्याच्या आधारे निवडणूक लढवून विजय मिळवला असल्याचा आरोप लीलाबाई तायडे यांनी केला आहे. तायडे यांनी जळगाव जिल्हाधिकारी आणि जळगाव तहसीलदार यांच्याकडे तक्रार करत, त्यांच्या तहसील कार्यालयाच्या बोगस सही-शिक्क्याच्या जातीचे प्रमाणपत्र तयार केल्याप्रकरणी चौकशी करून फौजदारी फसवणुकीचा (४२०) गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
या गंभीर तक्रार अर्जाची जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेतली आहे. त्यांनी जळगाव तहसीलदारांना या प्रकरणी फौजदारी कारवाई संदर्भात अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, जळगाव तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून फसवणूक केल्याप्रकरणी जळगाव तहसीलदार या संपूर्ण प्रकरणाची मंडळ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून लवकरच कारवाई करणार असल्याचे समजते.
या कारवाईकडे संपूर्ण रावेर तालुक्याचे लक्ष लागले असून, या प्रकरणामुळे तालुक्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ग्रामपंचायत सदस्य लीलाबाई घनश्याम तायडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरपंच ज्योती कोळी यांनी बनावट सही-शिक्क्याचे जात प्रमाणपत्र तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी लवकरच तीन ठिकाणी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. यामध्ये तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी रावेर ग्रामपंचायत निवडणूक, जळगाव तालुका तहसीलदार यांच्या नावाचा बोगस सही-सिक्का तयार केल्याबद्दल, तसेच जात वैधता पडताळणी समिती धुळे यांच्याकडे खोट्या कागदपत्रांच्या आधारे बोगस दाखला पडताळणीसाठी सादर केल्याबद्दल गुन्हे दाखल होण्याचे आदेश मिळतील अशी अपेक्षा आहे.