ऑल इंडिया पँथर सेनेचे विविध मागण्यांसाठी आंदोलन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । ऑल इंडिया पँथर सेनेचे नेते दीपकभाई केदार यांच्या गाडीवर भ्याड हल्ल्यातील हल्लेखोरांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ऑल इंडिया पेंटर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा नेते दीपक केदार यांच्यावर परभणी जिल्ह्यातील सेलू गावात प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या गावगुंडांना तात्काळ अटक करावी. सोबत या हल्ल्याचा आदेश देणारा मुख्य सूत्रधार कोण त्याचा तपास करून त्याच्यावर देखील कारवाई करावी. बीड जिल्ह्यातील माजलगाव सुर्डी येथे आठ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी. या गुन्ह्यातील खटला हा गावाजवळ असलेल्या कोर्टात फास्टट्रॅक पद्धतीने चालविण्यात यावा. तसेच पीडित चिमुकलीला शासनातर्फे तातडीने २० लाख रुपये आर्थिक मदत करावी, तसेच पीडितेच्या शिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्र शासनाने स्वीकारावी आणि बलात्कार प्रकरणातील संशयित आरोपीला पाठीशी घालणाऱ्या व कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे. या दोन मागण्यांचा विचार करून योग्य तो न्याय न मिळाल्यास भविष्यात अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर जळगाव जिल्हाध्यक्ष निलेश पवार, महानगर तालुकाध्यक्ष लखन पाटील, चाळीसगाव तालुकाध्यक्ष सागर निकम, जिल्हा संघटक भूषण साळुंके, ग्रामीण जिल्हाध्यक्ष निलेश पवार, भुसावळ तालुकाध्यक्ष मनीषा पाटील स्वाक्षर्‍या आहेत.

Protected Content