जळगाव प्रतिनिधी । यावल तालुक्यातील आठ महिन्याच्या आदिवासी बालकाचा कुपोषणाने मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तातडीने अहवाल सादर करून यात कुणी कसूरवार आढळल्यास कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत. तर आदिवासी समुदायाला सर्वतोपरी मदतीची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली आहे.
याबाबत वृत्त असे की, यावल तालुक्यातील आसराबारी या आदिवासी पाड्यावरील रहिवासी आकाश जवानसिंग पावरा या मुलाचा शनिवारी सकाळी जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल होतांना मृत्यू झाला. सदर बालकाचा मृत्यू हा कुपोषणामुळे झाल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले असून यामुळे बालकाचे शवविच्छेदन करण्यात आले असून याचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेची पालकमंत्र्यांनी दखल घेऊन आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याशी याबाबत चर्चा केली. यात यावल तालुक्यातील कुपोषणाबाबत आधीच तेथे बैठक घेण्यात आली असल्याची माहिती डॉ. आशिया यांनी दिली. या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे या प्रकरणाची तातडीने चौकशी करून तालुक्यातील कुपोषीत बालकांबाबत तातडीने अहवाल सादर करून आवश्यक ती कार्यवाही करावी असे निर्देश पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिले.
या संदर्भात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, यावल तालुक्यातील कुपोषीत बालकाचा मृत्यू ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणी चौकशी करण्यात येत असून कुणी दोषी आढळल्यास त्याची हयगय करण्यात येणार नाही. सर्वात महत्वाची बाब म्हणजे भविष्यात या प्रकारची दुर्घटना होऊ नये म्हणून आदिवासी पाड्यांवरील बालकांच्या पोषणासाठी शासकीय योजनांच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत पोहोचविली जाते.. राज्य शासनाने आदिवासी समुदायासाठी आधीच अनेक कल्याणकारी योजना जाहीर केल्या असून याच्या यशस्वी अंमलबजावणीकडे आमचे विशेष लक्ष आहे. या संदर्भात आपण वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा केली असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली आहे.