Home क्राईम मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड ; दोन आरोपी ताब्यात

मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड ; दोन आरोपी ताब्यात

0
9


चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरात मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून दोन मोटारसायकली असा एकूण ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच आणखी एका संशयित इसमाकडून २५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल ताब्यात घेण्यात आली आहे.

दिनांक १४ जून २०२६ रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक २८९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) प्रमाणे मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असताना पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, चोरीस गेलेली एचएफ डिलक्स मोटारसायकल चाळीसगाव येथील राहुल सुभाष भिसे (रा. हनुमानसिंग नगर, चाळीसगाव) याने चोरी केली आहे.

मिळालेल्या माहितीची खात्री करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राहुल भिसे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून होंडा युनिकॉर्न मोटारसायकल जप्त करण्यात आली. त्याची सखोल चौकशी केली असता चोरीस गेलेली एचएफ डिलक्स मोटारसायकल त्याने प्रशांत दीपक राजपूत (रा. हरीगिरी बाबा नगर, पाटणादेवी रोड, चाळीसगाव) याला विकल्याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी प्रशांत राजपूत याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता राहुल भिसे याने सदर मोटारसायकल २० हजार रुपयांना विकल्याचे निष्पन्न झाले. मोटारसायकलचे आरसी बुक मागितल्यानंतर राहुल भिसे याने नंतर देतो असे सांगून टाळाटाळ केल्याचेही चौकशीत समोर आले.

या कारवाईत पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून एकूण ८० हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. पुढील तपासासाठी आरोपी व जप्त मुद्देमाल चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून चाळीसगाव शहरात गुन्हेगार वॉच पेट्रोलिंग सुरू असताना अहिल्याबाई होळकर चौक परिसरात एक इसम विनानंबर प्लेटची मोटारसायकल घेऊन संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी केली असता त्याने आपले नाव प्रशांत दत्तात्रय राठोड (वय २७ वर्षे, रा. यशवंतनगर रोड, चाळीसगाव) असे सांगितले.

त्याच्याकडे असलेल्या मोटारसायकलबाबत विचारणा केली असता तो समाधानकारक माहिती देऊ शकला नाही. त्यामुळे संशयित प्रशांत राठोड व त्याच्या ताब्यातील यामाहा कंपनीची एफझेड मोटारसायकल, ज्याची किंमत २५ हजार रुपये आहे, पुढील कायदेशीर कारवाईसाठी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आली आहे. ही कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, चाळीसगाव परिमंडळाचे अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच चाळीसगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजय ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, पोहेकॉ लक्ष्मण पाटील, पोलीस कर्मचारी राहुल पाटील, भूषण पाटील यांच्यासह पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली.


Protected Content

Play sound