जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मू. जे.महाविद्यालय जळगाव संचालित सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथीच्या वतीने १८ नोव्हेबर रोजी सहाव्या राष्ट्रीय निसर्गोपचार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त श्री. राकेश शेटे, नागपूर यांचे ‘निसर्गोपचाराचे जीवनातील महत्त्व आणि आवश्यकता’ या विषयावर आभासी पटलावर जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
व्याख्यानामध्ये श्री. राकेश शेटे यांनी स्वतःच्या अनुभवांची जोड देत निसर्गोपचाराचे महत्त्व सांगितले. त्याचबरोबर निसर्गोपचाराचा अंगीकार करण्यासाठी एक नवा दृष्टिकोन दिला. दुष्परिणाम विरहित पंचमहाभौतिक चिकित्सेविषयी सखोल माहिती उपस्थितांना दिली आणि शरीरातील सप्तधातू व निसर्गोपचार यांचा सहसंबंध स्पष्ट केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोहम डिपार्टमेंटचे संचालक डॉ. देवानंद सोनार यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी आधुनिक युगातील निसर्गोपचाराची आवश्यकता विशद करून, योग निसर्गोपचार यांच्या प्रचार प्रसारासाठी मू. जे. महाविद्यालयाचा सोहम योग निसर्गोपचार विभागाचे योगदान आणि शैक्षणिक अभ्यासक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य सं. ना. भारंबे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सोनल महाजन यांनी तर अतिथींचा परिचय आणि आभार प्रदर्शन प्रा. अनंत महाजन यांनी केले. कार्यक्रमासाठी सोहम विभागातील सर्व प्राध्यापक आणि योग निसर्गोपचार प्रेमी साधक आणि विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली.