मोटारसायकलींची समोरासमोर धडक: एक ठार ; दोन जखमी

accident bike truck samarsleel 800x445

जळगाव, प्रतिनिधी  | तालुक्यातील वावदडा-रामदेववाडी दरम्यान रस्त्यावर दोन मोटारसायकलींची समोरासमोर जोरदार धडक झाल्याची घटना सायंकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास घडली.  या अपघातात एकाचा मृत्यू तर दोघे जखमी झाले आहेत. बिरबल मोरसिंग राठोड (वय ४५ रा. रामदेववाडी) असे मयताचे नाव आहे.

याबाबत गावातील नागरिकांकडून मिळालेली माहिती अशी की, रामदेववाडी येथील बिरबल मोरसिंग राठोड यांचे मोठे जावाई मुकेश पवार (वय २८, रा. तरडी)  हे त्यांच्याकडे आले होते. दरम्यान, सासरे बिरबल राठोड व जावाई मुकेश पवार हे दोघे वावडदा येथे गेले होते. वावडदा येथून ते मोटारसायकलीने घरी परत येत होते. तसेच रामदेववाडी येथील राजेश धनराज राठोड (वय १८) व दिलीप रामा राठोड हे दोघे समान घेण्यासाठी वावदडा येथे जात होते. बिरबल राठोड व राजेश राठोड यांची मोटारसायकल समोरासमोर धडकल्याने बिरबल राठोड, त्यांच्या जावाई मुकेश पवार व दुसर्‍या मोटारसायकलीवरील राजेश राठोड हे तिघे जखमी झाले. त्यांना तात्काळ नागरिकांच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. बिरबल राठोड याच्या डोक्याला जबर दुखापत झाली असल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. सुपे यांनी त्याला तपासणीअंती मयत घोषित केले. तर अपघातातील जखमी मुकेश पवार व राजेश राठोड या दोघांच्या पायाला जबर दुखापत झाली आहे. या घटनेची माहिती कळताच एमआयडीसी पोलीसांनी याठिकाणी धाव घेतली.

पत्नीला घेण्यासाठी आला होता मुकेश

मयत बिरबल राठोड यांची मोठी मुलगी रक्षाबंधन असल्याने माहेरी रामदेववाडी येथे आली होती. दरम्यान तिचा पती मुकेश हा तिला घेण्यासाठी रामदेववाडी येथे आला होता. अपघातात तो देखील गंभीर जखमी झाला असून त्याच्या उजव्या पायाला जबर दुखापत झाली आहे. मयत बिरबल याच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.

Protected Content