मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | यंदा पहिल्यांदाच मे महिन्यात मान्सूनचे राज्यात आगमन झाले असून मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस पडत आहे. आज राजधानीत जोरदार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून पुण्यालाही पावसाचा मोठा फटका बसला आहे.
भारतीय हवामान विभागाने २६ मे २०२५ रोजी मुंबईत मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली असून, ही नोंद गेल्या ६८ वर्षांत सर्वात लवकर झालेली आहे. सरासरी मान्सून आगमनाची तारीख ११ जून असून, यंदा तब्बल १६ दिवस आधी मान्सूनची दमदार एंट्री झाली आहे. हवामानतज्ज्ञांच्या मते, अरबी समुद्रावरील कमी दाबाचा पट्टा आणि बदललेली वाऱ्यांची दिशा यामुळे यंदाचा मान्सून गतीने पुढे सरकला.
दरम्यान आजच्या पावसामुळे मुंबईत अनेक सखल भाग जलमय झाले असून वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे. नागरिकांनी सोशल मीडियावर पावसाचे व्हिडीओ आणि परिस्थिती शेअर करत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
तर दुसरीकडे राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आज सकाळीच मंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षात थेट उपस्थित राहून सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षालाही भेट दिली. महापालिकेच्या नियंत्रण कक्षात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः उपस्थित होते. त्यांनी स्थानिक यंत्रणांशी समन्वय साधून उपाययोजनांचा आढावा घेतला.
मान्सूनबाबत गिरीश महाजन यांनी सांगितले की “सध्या मी स्वतः मंत्रालयात उपस्थित असून राज्य नियंत्रण कक्षातून सतत जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मी सातत्याने समन्वय साधत आहे. सर्व आपत्कालीन यंत्रणा सज्ज आहेत. नागरिकांनी सहकार्य करावे.”