कॉलेजच्या आवारांमध्ये लागणार मोदींच्या आभाराचे फलक !

नवी दिल्ली वृत्तसंस्था । पंतप्रधान मोदी यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत लस उपलब्ध करून दिल्यामुळे शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या आवारात यासाठी पंतप्रधानांचे आभार मानणारे फलक लावावेत असे निर्देश युजीसीने दिले असून यावरून वाद होण्याची शक्यता आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील सर्व विद्यापीठे, आयआयटी संस्था आणि अधिकाराच्या कक्षेत येणार्‍या इतर शैक्षणिक संस्थांना एक आदेश दिला आहे. ज्यात मोफत लसीकरणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानणारे बॅनर्स विद्यापीठात लावण्यास सांगण्यात आले आहेत.

२१ जूनपासून देशात १८ वर्षांपुढील सर्वांच्या मोफत लसीकरणाला सुरूवात झाली. त्यापूर्वीच म्हणजे २० जून रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना हे आदेश दिले आहेत. बॅनर्स कशा पद्धतीचं असावे, याबद्दलचं डिझाईनही विद्यापीठ अनुदान आयोगाने सांगितलं आहे. हिंदी आणि इंग्रजी अशा भाषेत हे बॅनर्स आहेत. विद्यापीठांमध्ये लावायच्या बॅनर्सचे डिझाईन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने तयार करून दिले आहे. या बॅनरवर सर्वांच्या मोफत लसीकरणासाठी मोदीजी, धन्यवाद असा आशयाचा मजकूर आहे. त्याचबरोबर जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम असा उल्लेखही करण्यात आलेला आहे.

या फलकावर पंतप्रधान मोदी यांचा फोटोही आहे. या निर्देशांबाबत माहिती व प्रसारण मंत्रालयातील अधिकार्‍यांनीही यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. तर हे निर्देश आता वादाच्या भोवर्‍यात सापडणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

Protected Content