मोठ्या उद्योगपतींना कृषी क्षेत्रात घुसवण्याचा मोदींचा डाव – मलिक

मुंबई । कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने आज कुर्ला येथे शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ चक्का जाम आंदोलन पुकारण्यात आले होते आणि या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला होता.

आजच्या या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक सहभागी झाले होतेच शिवाय मुंबईभरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोदी – शहाची तानाशाही नही चलेगी… नही चलेगी… आवाज दो हम एक है… जय जवान जय किसान… भारत माता की जय… किसानों के अधिकारमे राष्ट्रवादी मैदान मे… अशा जोरदार घोषणा देत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कुर्ला परिसर दणाणून सोडला.

यावेळी नवाब मलिक यांनी केंद्र सरकार आणि मोदी यांच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. भाजप शेतकऱ्यांचा पक्ष नसून शेतकऱ्यांच्या मालाची लूट करणारा पक्ष असल्याचे सांगतानाच मोठ्या उद्योगपतींना कृषी क्षेत्रात घुसवण्याचा डाव असल्याचा थेट आरोप नवाब मलिक यांनी केला.

सरकारला मॉर्डन कायदा आणण्याचा अधिकार असताना भाजप सरकारने डायरेक्ट कायदाच बनवला आहे. या तीन कृषी कायद्याविरोधात गेले चार महिने शेतकरी आंदोलन करत आहेत. शरम वाटली पाहिजे मोदी व भाजप सरकारला शेतकऱ्यांना आतंकवादी बोलताना असा हल्लाबोल नवाब मलिक यांनी केला. लाल किल्ल्यावर जो प्रकार घडला त्याला शेतकरी नाही तर भाजप जबाबदार असल्याचेही नवाब मलिक म्हणाले.

ही परिवर्तनाची लढाई दिल्लीतून सुरू झाली आहे आणि आता ती देशाच्या कानाकोपऱ्यात पोचली आहे. त्यामुळे आता तरी मोदी सरकार जागे व्हा आणि कृषी कायदे रद्द करा अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली.

 

Protected Content