

जळगाव–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता सज्ज झाली आहे. पक्षाध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि नेते माजी आमदार ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव येथे झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत मनसेच्या संघटनात्मक तयारी, कार्यकर्त्यांची एकजूट आणि निवडणुकीसाठीची रणनिती यावर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीने जिल्ह्यातील मनसेच्या राजकीय समीकरणांना नवसंजीवनी मिळाल्याचे दिसून येत आहे.
दि. २५ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी तीन वाजता पद्मालय विश्रामगृह, नेहरू चौक, जळगाव येथे पार पडलेल्या या बैठकीत जिल्हाभरातील सर्व १५ तालुक्यांतील पदाधिकारी, महिला सेना, विद्यार्थी सेना, शेतकरी सेना आणि विविध अंगीकृत संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांसाठी मनसेच्या रणनीतीबाबत या बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले.
ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “आगामी निवडणुका म्हणजे मनसेच्या संघटनशक्तीची खरी परीक्षा आहे. प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मतदार यादींची बारकाईने तपासणी करावी. दुबार नावं, चुकीची नोंद किंवा मतदारयादीतील अनियमितता त्वरित ओळखावी आणि दुरुस्त करावी. योग्य व्यक्ती योग्य ठिकाणी असावी, यासाठी जिल्हाध्यक्षांनी संघटनात्मक अहवाल तयार करावा.” त्यांच्या मार्गदर्शनाने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
या बैठकीत जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, अनिल वाघ, मुकुंदा रोटे व कमलाकर घारू यांनी आपल्या-आपल्या विभागांतील संघटनस्थिती आणि निवडणूक तयारीचा आढावा सादर केला. प्रभाग आणि तालुका पातळीवर स्वतंत्र बैठका घेऊन घराघरांत मनसेचा संपर्क वाढविणे, जनसंपर्क अभियान राबविणे आणि युवकांचा सक्रिय सहभाग वाढविण्याचे ठरविण्यात आले.
बैठकीच्या शेवटी ॲड. जयप्रकाश बाविस्कर म्हणाले, “मनसेची ओळख म्हणजे शिस्त, प्रामाणिकपणा आणि निडरपणे सत्यासाठी उभे राहणे. आगामी निवडणुकांमध्ये मनसे हा पर्याय नाही, तर एक आवश्यकता ठरणार आहे. महाराष्ट्रात जनतेला पर्याय हवा आहे आणि तो पर्याय म्हणजे मनसे आहे.”
बैठकीत जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, मुकुंदा रोटे, अनिल वाघ, कमलाकर गारू, उपजिल्हाध्यक्ष संजय नन्नवरे, कृष्णा दिंदोले, तालुकाध्यक्ष अशोक पाटील, विशाल सोनार, राहुल सोनटक्के, ज्ञानेश्वर ठाकरे, राजेंद्र लिंगायत, शहराध्यक्ष विनोद शिंदे, उपशहराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, राजेंद्र निकम, ललित शर्मा, प्रकाश जोशी, चेतन पवार, धरणगाव शहराध्यक्ष संदीप फुलझाडे, नशिराबाद शहराध्यक्ष जितेंद्र बराटे, वाहतूक सेनेचे रजाक सय्यद, शेतकरी सेनेचे अविनाश पाटील, विद्यार्थी सेनेचे योगेश पाटील, कल्पेश पवार, ऐश्वर्या शिरामे, तसेच महिला सेनेच्या अनिता कापुरे आणि लक्ष्मी भील यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीचा समारोप जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानून केला. कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे मनसे जळगाव जिल्ह्यात नव्या जोमाने निवडणूक लढविण्यास सज्ज झाल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले.



