Home Cities जळगाव वाढत्या उन्हामुळे सिग्नल बंद ठेवण्याची मनसेची मागणी

वाढत्या उन्हामुळे सिग्नल बंद ठेवण्याची मनसेची मागणी


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात वाढलेल्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वाहतूक सिग्नल संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी वाहतूक विभागाकडे सविस्तर निवेदन सादर केले असून, पोलिसांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

जळगाव शहरात सध्या तापमानाचा पारा प्रचंड वाढला आहे. विशेषतः दुचाकी चालकांना कडक उन्हात वाहतूक सिग्नलवर दीर्घकाळ थांबावे लागत असल्याने चक्कर येणे, डिहायड्रेशन आणि अशक्तपणा यांसारख्या आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. मनसेने या पार्श्वभूमीवर सकाळपासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत शहरातील प्रमुख सिग्नल बंद ठेवण्याची मागणी केली आहे. तसेच, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात करून पर्यायी व्यवस्था करण्याचेही सुचवले आहे.

या निवेदनाची दखल घेत वाहतूक पोलिस निरीक्षकांनी सकारात्मक भूमिका दर्शवली असून, याबाबत तातडीने निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही दिली आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना आणि दुचाकीस्वारांना उष्णतेपासून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, आशुतोष जाधव, चेतन पवार, संदीप मांडोळे, खुशाल ठाकूर, राहुल चव्हाण यांच्यासह शेतकरी सेनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.


Protected Content

Play sound