Home क्राईम बंद घराचा फायदा घेऊन चोरट्यांची हातसफाई ; साडेनऊ लाखांचा मुद्देमाल लंपास

बंद घराचा फायदा घेऊन चोरट्यांची हातसफाई ; साडेनऊ लाखांचा मुद्देमाल लंपास


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गुरुनानक नगर परिसरात घरफोडीची मोठी घटना समोर आली आहे. लग्नानिमित्त बाहेर गावी गेलेल्या एका कुटुंबाच्या बंद घराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रकमेवर डल्ला मारला आहे. या चोरीत तब्बल ९ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, संतोष शामलाल आटवाल (वय ४०) हे जळगाव महानगरपालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत. २६ एप्रिल रोजी ते आपल्या कुटुंबासह मालेगाव येथे नातेवाईकांच्या लग्नासाठी गेले होते. यावेळी त्यांनी घराचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून घराच्या मागील बाजूचा दरवाजा लॉक केला होता.

२८ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता जेव्हा ते घरी परतले, तेव्हा त्यांना घराच्या मागील बाजूचा दरवाजा उघडा असल्याचे दिसले. घरात प्रवेश करून पाहिल्यास त्यांना कपाट फोडलेले आणि सामान विस्कटलेले दिसले. अज्ञात चोरट्यांनी कपाटातून ५० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन (किंमत ३ लाख), ५० ग्रॅमचा सोन्याचा ब्रेसलेट (३ लाख), २५ ग्रॅमचा ब्रेसलेट (१.५ लाख), २५ ग्रॅमचा सोन्याचा नेकलेस व झुमके (१.५ लाख) आणि ४० हजार रुपये रोख असा एकूण ९ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला असल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणी संतोष आटवाल यांनी तत्काळ शनिपेट पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.


Protected Content

Play sound